भाजपा-शिवसेनेचे हे बोक्यांचे भांडण
By admin | Published: February 18, 2017 03:33 AM2017-02-18T03:33:11+5:302017-02-18T03:33:11+5:30
भाजपा-शिवसेनेचे भांडण हे दोन बोक्यांचे भांडण असून, ते सत्तेच्या लोण्याचा गोळा खाण्यासाठी आहे. २३ फेब्रुवारीनंतर ‘आपण दोघे मिळून खाऊ
पुणे : भाजपा-शिवसेनेचे भांडण हे दोन बोक्यांचे भांडण असून, ते सत्तेच्या लोण्याचा गोळा खाण्यासाठी आहे. २३ फेब्रुवारीनंतर ‘आपण दोघे मिळून खाऊ’ अशी भाजपा व शिवसेनेची भूमिका असेल, अशी टीका प्रदेश काँगेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने बोपोडी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार हुसेन दलवाई, आमदार शरद रणपिसे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, पुणे शहर व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, गोपाल तिवारी, संजय बालगुडे, एनएसयूआयचे अध्यक्ष अमीन शेख, मनीष आनंद, काका धर्मावत, दत्ता गायकवाड, निर्मला छाजेड, आनंद छाजेड, संगीता गायकवाड, सोनाली गायकवाड, मारुतराव गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘‘भाजपा- शिवसेनेचे भांडण हे दिखाऊपणाचे नाटक आहे. ज्यांना भाजपाला मतदान करायचे नाही, त्यांनी शिवसेनेला मतदान करा आणि ज्यांना शिवसेनेला मतदान करयचे नाही, त्यांनी भाजपाला मतदान करायचे, यासाठी हे भांडण आहे.’’
शिवसेनेचा मराठी बाणा कुठे गेला? असा सवाल करून एवढी बिकट अवस्था शिवसेनेची यापूर्वी कधीच झाली नव्हती, भाजपाच्या मागे ते फरफटत जात आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली. शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते ‘खिशात राजीनाम घेऊन फिरतो’ असे सांगतात; मात्र गेटच्या आत जात नाहीत. ‘इस्तिफा देंगे मगर तारीख नहीं बतायेंगे’ अशी अवस्था शिवसेनेची झाल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी खासदार हुसेन दलवाई, राधाकृष्ण विखे-पाटील, डॉ. विश्वजित कदम यांचीही भाषणे झाली. (प्रतिनिधी)