नाणारबाबत भाजप-शिवसेनेची भूमिका दुटप्पी - राधाकृष्ण विखे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 10:20 PM2018-07-13T22:20:51+5:302018-07-13T22:21:08+5:30
नाणार प्रकल्पासंदर्भात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची भूमिका दुटप्पी असून, दोघेही कोकणवासियांची फसवणूक करीत असल्याचा ठपका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठेवला आहे.
नागपूर : नाणार प्रकल्पासंदर्भात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची भूमिका दुटप्पी असून, दोघेही कोकणवासियांची फसवणूक करीत असल्याचा ठपका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठेवला आहे.
नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष प्रचंड आक्रमक झाल्याने आजही सलग तिसऱ्या दिवशी विधानसभेचे कामकाज तहकूब झाले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी भाजप आणि शिवसेना दोघांवरही सडकून टीका केली. नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेले निवेदन असमाधानकारक व दिशाभूल करणारे होते. नाणार प्रकल्पावर समन्वय आणि संवादाने मार्ग काढला जाईल, असे मुख्यमंत्री सांगतात. मात्र दुसरीकडे केंद्राच्या पातळीवर प्रकल्प पुढे नेण्यासंदर्भात करारही केले जातात. समन्वय आणि संवादातून मार्ग काढला जाणार असेल तर त्यापूर्वीच करार करण्याची घाई कशासाठी? असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला.
विखे पाटील यांनी यावेळी शिवसेनेच्या दुतोंडी भूमिकेचाही चांगलाच समाचार घेतला. नाणार प्रकल्प रद्द करावा म्हणून शिवसेनेचे आमदार विधानसभेत गोंधळ करत असताना शिवसेनेचे मंत्री शासकीय कामकाजात सहभागी होताना दिसतात. नाणार प्रकल्पाची भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याच्या प्रस्तावावर मी सही केली असून, मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी द्यावी, असे शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करणारे उद्योग मंत्री सांगतात. पण उद्योग मंत्र्यांच्या सहीला काहीच किंमत राहिलेली नाही का? या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी, यासाठी शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळात जाब विचारताना का दिसत नाहीत? मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री फक्त बिस्किटे खायला जातात का? असे अनेक प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केले. मंत्रिमंडळात अन् विधानसभेत वेगवेगळी भूमिका घेण्याचा असा दुटप्पी प्रकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही घडला नसल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.