“देवाभाऊ CM आहेत, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, योग्यवेळी २१०० रुपये देणार”: शिवेंद्रराजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 19:29 IST2025-04-09T19:28:07+5:302025-04-09T19:29:30+5:30
Ladki Bahin Yojana: आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करतील. देवेंद्र भाऊ योग्य वेळी २१०० रुपयांबाबत निर्णय घेतील, असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे.

“देवाभाऊ CM आहेत, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, योग्यवेळी २१०० रुपये देणार”: शिवेंद्रराजे
Ladki Bahin Yojana: २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरलेली आहे. विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. परंतु, याची पूर्तता कधी होईल, याची निश्चित शाश्वती नसल्याचे म्हटले जात आहे. यातच राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केले आहे.
काहीच दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत राज्य सरकारचे कौतुक केले होते. लाडकी बहीण योजना राज्य सरकारने तयार केली आहे आणि राज्य सरकार ती चालवत आहे. या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून यशस्वीपणे राबवली जात आहे, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले होते. आता शिवेंद्रराजे यांनी याबाबत एका सभेत बोलताना गॅरंटी दिली आहे.
देवाभाऊ CM आहेत, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
अनेक योजना शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या आहेत. या योजनांचा चांगल्या पद्धतीने लाभ करून घ्यायला हवा. लाडकी बहीण योजना सुरू आहेच. या योजनेबाबत विरोधक गैरसमज पसरवत आहेत. परंतु, माझी सर्व बहिणींना विनंती आहे की, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आपण काळजी करू नका. वाढीव हप्ता देण्याचा निर्णय योग्यवेळेला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेतला जाईल. जे काही २१०० रुपये जाहीर केले होते, ते योग्यवेळेला आपल्याला देवेंद्रभाऊ देणार. कारण आपला भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे देवेंद्र भाऊ नक्कीच योग्यवेळाला हा निर्णय करतील. आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करतील, अशी ग्वाही शिवेंद्रराजे यांनी दिली.
दरम्यान, राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्यासाठी अनेक योजना बनवत आहेत. परंतु, खऱ्या अर्थाने या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. लोकांना या योजनांची माहिती मिळत नाही. या योजना आपल्याला हव्या असतील तर काय करावे लागते, याची योग्य आणि पुरेशी माहिती लोकांकडे नसते. थोडा वेळ काढून सरकारी कार्यालयात जाऊन याची माहिती घ्यावी, असे आवाहन शिवेंद्रराजे यांनी केले. काही जण योजनांचा पूरेपूर लाभ घेतात, तर काही जण गैरफायदाही घेतात, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.