भाजप-शिवसेना युती : आता मोदीही म्हणाले, उद्धव ठाकरे लहान भाऊ !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 04:32 PM2019-09-07T16:32:41+5:302019-09-07T17:08:23+5:30
शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी भाऊगिरीचे राजकारण सुरू करण्यात आले होते. मात्र यावेळी शिवसेनेकडून स्वत:ला जुळा भाऊ म्हणून संबोधण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांनीच शिवसेना-भाजप जुळे भाऊ असल्याचे म्हटले होते.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी मेट्रोच्या तीन मार्गिकांचं भूमीपूजन केलं. यावेळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यातच मोदींनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी काढलेले उद्गार चर्चेचा विषय ठरत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची आघाडी आणि युतीसाठी चर्चा सुरू आहे. परंतु जागा वाटपाबाबतचा निर्णय अद्याप एकाही पक्षाचा निश्चित झाला नाही. तर शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागा वाटप निश्चित होईपर्यंत युती झाली असं म्हणण्याचे धारिष्ठ्य कोणीही दाखवणार नाही. त्यातच घटकपक्ष डोकं वर काढत असल्याने युतीतील जागा वाटप आणखीच लांबण्याची शक्यता आहे.
२०१४ मध्ये शिवसेना-भाजप यांच्यात मोठा भाऊ, लहान भाऊ असा वाद रंगला होता. त्यावेळी शिवसेनेने मोठा भाऊ असल्याचे सांगत अधिक जागांची मागणी केली होती. परंतु, भाजपला ती मान्य नव्हती. त्यामुळे युती फिस्कटली होती. परंतु, निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले. तसेच भाजपने सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेत शिवसेनेचा पाठिंबा घेतला. परंतु, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपच्या साथीत निवडणूक लढवली. त्यामुळे विधानसभेला युती होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी भाऊगिरीचे राजकारण सुरू करण्यात आले होते. मात्र यावेळी शिवसेनेकडून स्वत:ला जुळा भाऊ म्हणून संबोधण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांनीच शिवसेना-भाजप जुळे भाऊ असल्याचे म्हटले होते. राऊत यांचा रोख समान जागा वाटपाकडे होता. परंतु, आता भाजपकडून मोठा भाऊचा नारा देण्यात येत असून मुख्यमंत्रीपदासाठी देखील दावा सांगितला जात आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांना लहान भाऊ म्हणून संबोधले. मोदींनी उद्धव यांना लहान भाऊ संबोधल्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपात शिवसेना लहान भाऊ ठरणार का, अशा चर्चेना उधाण आले आहे. मात्र, शिवसेना-भाजप जुळे की थोरले-धाकटे भाऊ हे जागा वाटप निश्चित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.