अधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ; तंबीनंतरही सर्वच बंडखोर जोरात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 05:48 AM2019-10-13T05:48:46+5:302019-10-13T05:49:16+5:30

अनेकांनी झुगारला पक्षादेश; हकालपट्टीनंतरही माघार घेण्यास नकार

BJp, Shivsena gets trouble from rebels in Maharashtra Election | अधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ; तंबीनंतरही सर्वच बंडखोर जोरात!

अधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ; तंबीनंतरही सर्वच बंडखोर जोरात!

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीत अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करून रिंगणात उतरलेल्या काही जणांवर भाजप-शिवसेनेने हकालपट्टीची कारवाई केली असली, तरी अद्याप कुणीच माघार घेतली नाही की, पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. उलट, इतर पक्षांच्या पाठिंब्यावर आपल्या उमेदवारीचे घोडे जोरात दामटले आहे.


सर्वच पक्षांत बंडखोरीचे अमाप पीक आले असून, त्यांनी अधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ आणले आहे. या बंडखोरांना समजवायचे तरी कसे, असा प्रश्न सर्वच पक्षांच्या नेत्यांना पडला आहे. मतदानाला जेमतेम एकच आठवडा शिल्लक आहे आणि प्रचारासाठी उद्याचा रविवारच अतिशय महत्त्वाचा आहे. पुढील शनिवारनंतर प्रचार बंद होईल. त्यामुळे उद्याचा रविवार शक्तिप्रदर्शनाचा असतानाच, अनेक कार्यकर्तेच आता बंडखोरांसोबत दिसू लागल्याने महायुती व महाआघाडीचे नेते अस्वस्थ आहेत.


बंडखोरांमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, म्हणून भाजपने तुमसरचे आमदार चरण वाघमारे, मीरा-भार्इंदरच्या गीता जैन, उरणचे महेश बालदी, पिंपरी-चिंचवडमधील बाळासाहेब ओव्हाळ, अहमदपूर (जि. लातूर) येथील दिलीप देशमुख आणि सोलापूरचे महेश कोठे या पाच बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली. काँग्रेसनेही माजी आमदार सेवकभाऊ वाघाये (साकोली) आणि रामरतन राऊत या दोघा बंडखोरांना पक्षातून काढून टाकले आहे.


मात्र, तरीही नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), योगेंद्र गोडे (बुलडाणा), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजन तेली (सावंतवाडी), दिलीप कंदकुर्ते (नांदेड द.), राजेंद्र राऊत (बार्शी), राजेश बकाने (वर्धा), संजय देशमुख (दिग्रस), प्रा. राजू तोडसाम (आर्णी), डॉ. रवींद्र आरळी (जत), निशिकांत पाटील (इस्लामपूर), सम्राट महाडिक (शिराळा), शिवाजी जाधव (हिंगोली), चंद्रशेखर अत्तरदे (जळगाव ग्रामीण), प्रभाकर सोनवणे (चोपडा), अनिल यादव (शिरोळ), समरजित घाटगे (कागल), शिवाजी पाटील (चंदगड), विजय वहाडणे (कोपरगाव), रत्नाकर पवार (नांदगाव) हे भाजपचे बंडखोर युतीच्या विरोधात दंड थोपटून आहेत.


शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत (कणकवली) व बंडखोर उमेदवार बाबुराव कदम (हदगाव), धनंजय बोडारे (कल्याण पूर्व), नारायण पाटील (करमाळा), अशोक शिंदे (हिंगणघाट), डॉ. विश्वनाथ विणकरे (उमरखेड), शशिकांत पेंढारकर (वाशिम) आदींनीही पक्षाचे आदेश झुगारून घोडे दामटले आहे. पंढरपूर मतदारसंघात राष्टÑवादीचे भारत भालके यांच्या विरोधात काँग्रेसचे शिवाजी काळुंगे यांची उमेदवारी कायम असल्याने दोन्ही पक्षांत तणाव आहे.

बंडखोरांना जागा दाखवून देऊ - मुख्यमंत्री
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गद्दारांना टकमक टोकावरून ढकलून दिले जायचे. तशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. जनतेचे मत म्हणजेच टकमक टोक असून, त्याची प्रचिती गद्दारांना यंदाच्या निवडणुकीत नक्की येणार आहे. महायुतीमधील बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.


काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महायुतीमधील घटक पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी मदत केली, प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत त्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सोबत राहावे. महायुतीत जी जागा ज्या पक्षाला सुटली, त्याच पक्षाचे चिन्ह व झेंड्याखाली सर्वांनी काम करणे अपेक्षित आहे. असे होत नसेल, तर संबंधितांची भविष्यात गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

Web Title: BJp, Shivsena gets trouble from rebels in Maharashtra Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.