विधान परिषदेच्या मैदानात भाजपाला धक्का

By admin | Published: February 7, 2017 05:52 AM2017-02-07T05:52:48+5:302017-02-07T05:52:48+5:30

विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला धक्का बसला असून पक्षाने कोकणची जागा गमावली आहे

BJP shocks at Vidhan Parishad ground | विधान परिषदेच्या मैदानात भाजपाला धक्का

विधान परिषदेच्या मैदानात भाजपाला धक्का

Next

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला धक्का बसला असून पक्षाने कोकणची जागा गमावली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अमरावती पदवीधर मतदारसंघात गृह व नगरविकास राज्यमंत्री भाजपाचे डॉ. रणजित पाटील, नाशिक पदवीधरमधून काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे, कोकण शिक्षक मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेले शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील विजयी झाले. तर मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे तिसऱ्यांदा विजयाच्या उंबरठ्यावर होते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ही निवडणूक आघाडी करून लढविली होती. भाजपा-शिवसेनेची मात्र युती नव्हती. राज्याच्या शिक्षण खात्याचे निर्णय अन्यायकारक असल्याचा मुख्य मुद्दा विरोधकांच्या प्रचारात होता. अमरावतीमध्ये डॉ. रणजित पाटील यांनी काँग्रेसचे संजय खोडके यांचा ४३ हजार ८९७ मताधिक्क्याने दणदणीत पराभव केला. पाटील यांना ७८ हजार ५१ तर खोडके यांना ३४ हजार १३५ मते मिळाली. आ. बच्चू कडू समर्थक डॉ. दीपक धोटे यांना ५ हजार ९६४ मते पडली.
नाशिकमध्ये डॉ. सुधीर तांबे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला. त्यांनी भाजपाचे डॉ. प्रशांत पाटील यांचा दारुण पराभव केला. डॉ. तांबे यांनी ३५ हजार ८७२ मतांची आघाडी घेतली होती. ते माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आहेत.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांना आठव्या फेरीअखेर २२ हजार ८८७ मते मिळाली. ते विजयाच्या मार्गावर होते. भाजपा पुरस्कृत सतीश पत्की यांना १२ हजार ६१९ मते मिळाली.
कोकण शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार रामनाथ मोते यांनी बंडखोरी केली होती. तेथे भाजपाप्रणित शिक्षक परिषदेने वेणुनाथ कडू यांना उमेदवारी दिली. मोते, कडू, शिवसेनचे ज्ञानेश्वर म्हात्रे आदींवर मात करीत बाळाराम पाटील यांनी विजयश्री खेचून आणली.

        

विधान परिषदेत बहुमत आघाडीचेच
भाजपा-शिवसेनेचे विधानसभेत बहुमत असले तरी विधान परिषदेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बहुमत कायम आहे. ७८ सदस्यांच्या सभागृहात या दोन पक्षांचे मिळून ४३ सदस्य आहेत. अपक्ष व अन्य पक्षांचे पाच सदस्य हे आघाडीसोबत आहेत. भाजपा-शिवसेनेचे संख्याबळ २६ आहे. तीन अपक्ष युतीसोबत असून एक जागा रिक्त आहे.

प्रचंड मते अवैध
पदवीधर, शिक्षक असे मतदार असूनही प्रचंड प्रमाणात मते ही बाद ठरली. उच्चशिक्षित व्यक्तींना मतदानाचा हक्कही धड बजावता येत नाही, ही बाब या निमित्ताने दिसून आली. एकट्या अमरावती पदवीधर मतदारसंघातील अवैध मते १० हजार १५४ इतकी आहेत. नाशिकमध्ये पहिल्या फेरीत मोजलेल्या ३० हजार मतांपैकी ३ हजार ७३ मते बाद ठरली.


भाजपाला फटका
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात आतापर्यंत रामनाथ मोते हे भाजपाप्रणित आमदार होते. मात्र, ही जागा शेकापच्या आघाडीने भाजपाकडून हिसकावून घेतली. मोते यांच्या बंडखोरीचा फटका भाजपा पुरस्कृत शिक्षक परिषदेचे वेणुनाथ
कडू यांना बसला.

नागपूरचा आज निकाल
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू होईल. दुपारनंतर निकाल अपेक्षित आहे. तेथे भाजपा पुरस्कृत नागो गाणार विद्यमान आमदार आहेत.

Web Title: BJP shocks at Vidhan Parishad ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.