राज्यात मित्रपक्ष शक्तीशाली, भाजपने केंद्रातच लक्ष द्यावे - आडवाणी
By admin | Published: October 2, 2014 01:44 PM2014-10-02T13:44:36+5:302014-10-02T13:45:05+5:30
राज्यात २५ वर्ष जुनी युती तुटल्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी नाखुश असून यावरुन त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांनाच खडे बोल सुनावले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २ - राज्यात २५ वर्ष जुनी युती तुटल्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी नाखुश आहेत. 'एनडीएतील मित्रपक्ष राज्यामध्ये शक्तीशाली असल्याने राज्यात ते सत्तास्थापन करु शकतात तर केंद्रात सत्तास्थापनेची जबाबदारी भाजपची आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आपली जबाबदारी ओळखूनच काम करावे अशा शब्दात लालकृष्ण आडवाणी यांनी राज्यातील भाजप नेत्यांना सुनावले आहे.
स्वच्छता अभियानानिमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी गुरुवारी अहमदाबाद येथे आले होते. या अभियानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आडवाणींनी भाजप नेत्यांनाच खडे बोल सुनावले. 'महाराष्ट्रात युती तुटली नसती तर मला आनंदच झाला असता. आमच्या पक्षातील अनेक नेते जागावाटपावरुन नाराज होते. भाजपला जास्त जागा द्यायला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. याविषयी मला जास्त काही माहिती नाही. मात्र एनडीएतील मित्रपक्ष हे राज्यपातळीवरील पक्ष असल्याने राज्यात तेच शक्तीशाली आहेत असे आडवाणींनी म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही युतीतील तणावात हस्तक्षेप करण्याची मागणी आडवाणींकडे केली होती. मात्र आडवाणी यांना आता पक्षातील निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याने आडवाणी हस्तक्षेप करु शकले नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदीं हे चांगले असले तरी अटलबिहारी वाजपेयींसारखा पंतप्रधान पुन्हा होणे अशक्यच आहे असा चिमटाही त्यांनी मोदींना काढला.