भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचा शब्द पाळावा

By admin | Published: July 28, 2014 01:27 AM2014-07-28T01:27:40+5:302014-07-28T01:27:40+5:30

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने विदर्भ वेगळे राज्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता भाजपाने दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष,

The BJP should follow the word of giving a separate Vidarbha state | भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचा शब्द पाळावा

भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचा शब्द पाळावा

Next

पत्रपरिषद : जोगेंद्र कवाडे यांची मागणी
अमरावती : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने विदर्भ वेगळे राज्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता भाजपाने दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार जोगेंद्र कवाडे यांनी येथे केली.
अमरावतीत पीरिपाच्यावतीने रिपब्लिकन जनशक्ती सन्मान मेळाव्यासाठी आले असता त्यांनी येथील शासकीय विश्राम भवनात पत्र परिषद घेऊन लोकसभा तसेच येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीची भूमिका मांडली. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा नागपूर करारानुसारच विदर्भाचे विलिनीकरण झाले. मात्र, विदर्भाच्या वाट्याला केवळ उपेक्षाच आल्यात. बेरोजगारी, उद्योगधंद्यांच्या अभावामुळे विदर्भ त्रस्त आहे. त्यामुळे वेगळे विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय येथील जनतेला न्याय मिळणार नाही, असेही कवाडे म्हणाले. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत वेगळा विदर्भाचा ठराव मंजूर करण्यात आला. आता केंद्रातही भाजपचे शासन आहे. त्यामुळे मोदी शासनाने वेगळ्या विदर्भाची निर्मिती करून जनतेला दिलेला शब्द पाळावा, असे ते म्हणाले.
१ जानेवारी १९९० साली भूमिहिनांना मालकी हक्काने शासकीय जमिनीचे पट्टे द्यावे, असा राज्य शासनाने निर्णय घेतला; मात्र आजपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. राज्यात दलितांवर सातत्याने अत्याचार होत असून मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांपुढे ही बाब आवर्जून मांडण्यात आली. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत मैत्री असून ती कायम राहील. रिपाइंच्या ऐक्यासाठी यापूर्वी आपणच पुढाकार घेतला आहे. मात्र, निवडणुकांपूर्वी होणारे ऐक्य हे संधिसाधूपणाचे आहे. रामदास आठवले हे महायुतीत सामील झाले; मात्र फुले, शाहू, आंबेडकरांना मानणारा समाज हा जातीयवादी शक्तींसोबत कधीही जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी ठासून सांगितले. काँग्रेसने विधानपरिषदेचे सदस्यत्व देऊन वचनपूर्ती केल्याचा उच्चार यावेळी कवाडे यांनी केला. पत्र परिषदेला चरणदास इंगोले, रत्ना मोहोड, पुरुषोत्तम पाटील, डी.के. वासनिक, अरुण थोरात, जयदीप कवाडे, बंडू मुंदडा, रत्नकला खडसे, सुरेश बहादुरे, राजू मुंदडा, सुरेंद्र टेंभुर्णे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The BJP should follow the word of giving a separate Vidarbha state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.