...तर एकनाथ शिंदेकडे भाजपाने नेतृत्व द्यावे; NCP नेते जयंत पाटलांचा खोचक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 04:40 PM2023-06-13T16:40:27+5:302023-06-13T16:41:06+5:30
राज्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
सांगली - राज्यात शिवसेना-भाजपा सरकारमध्ये वाद सुरू झाल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यात मंगळवारी विविध वृत्तपत्रात झळकलेल्या शिवसेनेच्या जाहिरातीवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. या जाहिरातीत सर्व्हेच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टीका केली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती असेल, तर भाजपाने त्यांचे ऐकावे आणि एकनाथ शिंदेंना भाजपाने पूर्ण नेतृत्व द्यावं. त्यांच्या पक्षाने ७० ,८०, ९० जागा मागितल्या आहेत. त्यांना तेवढ्या द्याव्यात अशी आमची उपसूचना आहे असं पाटलांनी भाजपा-शिंदे गटावर खोचक टीका केली.
जिथं विरोधी पक्षाची ताकद जास्त, तिथं दंगली घडवल्या जातायेत
गेल्या तीनशे वर्षात ब्रिटिश आणि मुघलांच्या काळातही हल्ला झाला नाही. मात्र, या सरकारच्या काळात वारकऱ्यांच्यावर हल्ला झाला आहे. ज्यांच्यावर लाठी उगारली पाहिजे, ते राहिले बाजूला आणि वारकऱ्यांवर लाठी उगारली जाते आहे. असा आरोपी जयंत पाटील यांनी केला आहे. राज्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत. जातीय तणाव वाढणार नाही याची पोलिसांनी काळजी घ्यावी, ज्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे तिथे दंगली घडवल्या जात आहेत असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला.
सांगलीत जयंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची भेट घेत कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याबाबत निवेदन सादर केले. कोल्हापूर, नाशिक, नगर अशी ठिकाणी हे होत असताना हा पॅटर्न वापरला जात असल्याची शंका येते. कोल्हापूरसारख्या शाहूंच्या पुरोगामी विचारांची बांधणी अतिशय घट्ट आहे अशा ठिकाणी दंगल होते हे शंकास्पद आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एखादी बैठक बोलवावी, आम्ही विरोधी पक्ष म्हणून हवे ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. सोशल मिडीयाच्या फेक अकाउंट बाबत गांभीर्याने विचार करावा, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारे राज्य आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.