भाजपने शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नये : अंबादास दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 01:46 PM2020-02-18T13:46:40+5:302020-02-18T13:46:54+5:30
सत्ता गेल्यावर संभाजीनगरचा विषय काढणे हा निव्वळ भाजपचा ढोंगीपणा, असल्याचा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. तर सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाच्या तत्वाला मूठमाती दिली, असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. भाजपकडून सतत होत असलेल्या आरोपाला शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले असून, सत्तेचा माज चढलेल्या भाजपने जीभ आवरावी, शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशारा अंबादास दानवे यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.
दानवे म्हणाले की, भाजपचे नेते मस्तवालपणाची भाषा करीत आहेत. महाराष्ट्र हातचा गेल्यानंतर देशातील आदिवासीबहुल असलेल्या झारखंड व देशातील सर्वात उच्चभ्रु दिल्ली या दोन्ही ठिकाणी जनतेने तोंडावर आपटी दिल्यानंतरही शिवसेनेवर खालच्या पातळीवर जाऊन निंदानालस्ती करण्याचे प्रकार भाजपा नेते करीत आहे. तर सत्तेची खुर्ची हातून निसटल्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर, संभाजीनगर नामांतरावर भाजपची लोकं बेताल वक्तव्य करीत असल्याची टीका त्यांनी केली.
संभाजीनगर नामांतरात शिवसैनिकांनी अनेक आंदोलने, तुरुंगवास भोगलेला आहे. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात व देशात भाजपचे सरकार असतानाही शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत वारंवार मागणी केली. फडणवीस सरकारकडेही वारंवार संभाजीनगर नामांतराची मागणी केली, परंतु मागील सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे सत्ता गेल्यावर संभाजीनगरचा विषय काढणे हा निव्वळ भाजपचा ढोंगीपणा, असल्याचा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.