Raj Thackeray Interview: शिवसेना फुटण्याचं फुकट श्रेय भाजपाने घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचे - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 07:32 PM2022-07-23T19:32:32+5:302022-07-23T20:01:26+5:30
Raj Thackeray Interview on Shivsena, Uddhav Thackeray: बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा सामना सुरु केला होता, तेव्हा त्याचा खप साडेतीन चार लाख एवढा होता. आता तो काही लोकांकडेच जातो.
शिवसेना फुटली त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये. ते उद्धव ठाकरेंचेच आहे अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. देवेंद्र फडणवीस जेव्हा भेटायला आलेले तेव्हाचा किस्सा राज यांनी सांगितला.
बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा सामना सुरु केला होता, तेव्हा त्याचा खप साडेतीन चार लाख एवढा होता. आता तो काही लोकांकडेच जातो. तेव्हा त्याचा प्रचंड खप होता. आज मार्मिक किती लोक वाचतात? कोणीच नाही, कारण त्यात बाळासाहेब नाहीत. तशीच अवस्था या शिवसेनेची झाली आहे. नशिबाला जर कोणी यश म्हणत असेल तर त्याचा ऱ्हास सुरु होतो, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेवर टीका केली. झी २४ तासने राज यांची ब्लॅक अँड व्हाईट मुलाखत घेतली.
मुख्यमंत्री पद आपल्याला दिले नाही, असा आव शिवसेना नेत्यांनी आणला. उद्धव ठाकरे शेजारी बसलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील असे म्हटले होते. त्यानंतर अमित शहा यांनी देखील भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असे म्हटले होते. तेव्हा उद्धव यांनी का नाही आक्षेप घेतला. तेव्हा का नाही ते बोलले. जेव्हा विधानसभेचा निकाल लागला तेव्हा यांना आठवले का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
बाळासाहेब असताना दुसरा पक्ष काढणे सोपी गोष्ट आहे का? कोणीतरी पोरकट वक्तव्य केले, मी शरद पवारांच्या सांगण्यावरून पक्ष काढला, मी त्यांच्या सल्ल्यावरून का काढेन, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. शिवसेना पक्ष फुटण्यासाठी भाजपा नाही तर उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.
शिवसेनेची शकलं झालेली बघायला मिळतात, अशा परिस्थितीमध्ये जर बाळासाहेब असते तर अशी परिस्थिती ओढवाली असती का या प्रश्नावर राज ठाकरेंनी नाही शक्यच नाही असे उत्तर दिले. तुम्ही शिवसेना एक पक्ष किंवा संस्था म्हणून बघू नका, ती एका विचारानं बांधली गेलेली माणसं होती. बाळासाहेब होते तोपर्यंत तो विचार होता आणि त्या विचारासोबत बांधली गेलेली माणसं होती. असेपर्यंत तो विचार होता. त्यामुळे बाळासाहेब असते तर हे शक्यच नव्हतं.
देवेंद्र फडणवीसांना मी म्हणालो...
माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटलं उगाच फुकटचं श्रेय नका घेऊ नका, जी गोष्ट घडली आहे ती गोष्ट नाही तुम्ही घडवली, ना अमित शाहांनी घडवली, ना भाजपने घडवली ना अजून कोणी घडवली. याचं श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल. जी गोष्ट घडलेली आहे त्याचं तुम्ही श्रेय कसं काय काढून घेऊ शकता? असा सवालही राज यांनी उपस्थित केला.