"शिववडापाव, थाळीनंतर शिवदवाखाने येणार; डॉक्टरांऐवजी कंपाऊंडर तपासणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 01:08 PM2020-08-18T13:08:21+5:302020-08-18T13:18:07+5:30
खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेल्या विधानाचा भाजपाकडून समाचार
मुंबई: डॉक्टरांना काय कळतंय. मी नेहमी कंपाऊंडरकडून औषध घेतो, असं विधान केल्यानं शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र संजय राऊत त्यांच्या विधानावर ठाम आहेत. मी डॉक्टरांचा अपमान केलेला नाही. डॉक्टरांकडून सुरू असलेलं कार्य कौतुकास्पद असल्याचं राऊत म्हणाले. माझं विधान जागतिक आरोग्य संघटनेबद्दल होतं. मी डॉक्टरांचा अपमान होईल, असं काहीही म्हणालो नाही, असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं आहे. यावरून आता भाजपानं राऊत यांना टोला लगावला आहे.
शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशानंतर आता येत आहेत शिव दवाखाने.. इथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाऊंडर असतील, असं ट्विट करत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांना टोला हाणला आहे. डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला अधिक कळतं. मी त्यांच्याचकडून औषधं घेतो, असं संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात म्हटलं होतं. राऊत यांच्या विधानावर अनेकांनी टीका केली आहे.
शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशा नंतर आता येत आहेत शिव दवाखाने...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 17, 2020
इथे डॉक्टरांच्या ऐवजी
कंपाऊंडर असतील.
राऊत यांच्या विधानाबद्दल डॉक्टरांनी संताप व्यक्त केला आहे. मार्डनं राऊत यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. मार्डनं याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे विभागानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांचा राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
डॉक्टर-कंपाऊंडर विधानावरून वाद होताच संजय राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर देवदुतासारखे धावून आले. त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. त्यामुळे डॉक्टरांबद्दल मला नेहमीच आदर आहे. त्यांच्या कामाचं अनेकदा सामनामधून कौतुक करण्यात आलं. त्यामुळे त्यांचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही, असं राऊत म्हणाले. डॉक्टरांवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा शिवसेनाच धावून आली. मी स्वत: अनेक प्रकरणात डॉक्टरांची बाजू घेऊन त्यांच्या मागण्या मार्गी लावल्या आहेत. डॉक्टरांना मारहाण झाली तव्हा तोडफोड करणाऱ्यांना आम्हीच समजावून समेट घडवून आणला आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले.
आपलीसुद्धा हीच अधिकृत भूमिका आहे का?, राऊतांवरून मार्डच्या डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे, देवेंद्र फडणवीस यांची टीका
चर्चा तर होणारच... संजय राऊत, पार्थ पवार, आदित्य ठाकरे, अमृता फडणवीस ह्यांना झालंय तरी काय?