... तोच चेहरा असताना शिवसेनेला ६० चा आकडा गाठता आला नाही, भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 11:37 PM2022-01-24T23:37:25+5:302022-01-24T23:38:06+5:30
शिवबंधनाचे किती धागे तुटले, किती तलवारी म्यान झाल्या, किती निष्ठावंत दुरावले हेही पाहा, भाजपची टीका.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी युतीवरून भाजपवर जोरदार टीका केली. तसंच आपण २५ वर्षे युतीत सडलो या आपल्या वक्तव्याचा पुनरूच्चार केला. परंतु उद्धव ठाकरे यांच्या टीकांवर भाजपनं पलटवार केला आहे. भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"तिच भाषा तिच वाक्ये. ७ वर्षे उलटली. दिल्ली तर दूरच, महाराष्ट्रातही पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला. शिवबंधनाचे किती धागे तुटले, किती तलवारी म्यान झाल्या, किती निष्ठावंत दुरावले हेही पाहा," असं म्हणत उपाध्ये यांनी शिवसेना पक्षप्रमुखांवर निशाणा साधला. "माझा चेहरा भाजपने वापरल्यामुळे भाजपला मते मिळाली, १०५ जागांवर भाजपला विजय मिळाला, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. अहो पण तोच चेहरा असताना शिवसेनेने साधा ६०चा आकडाही गाठला नाही, ना आता चौथा क्रमांक पार करता आला नाही," असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
माझा चेहरा भाजपने वापरल्यामुळे भाजपाला मते मिळाली, १०५ जागांवर भाजपला विजय मिळाला, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला गेला अहो पण तोच चेहरा असताना शिवसेनेने साध ६०चा आकडाही गाठला नाही ना आता चौथा क्रमांक पार करता आला नाही #आपलाचेहराआपणचवापरावा#वास्तव
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 24, 2022
उद्धव ठाकरेंनी साधला होता भाजपवर निशाणा
भाजपला आपण पोसले. पण आपली २५ वर्षे युतीत सडली, या मतावर मी आजही ठाम आहे. भाजपने सत्तेसाठी हिंदुत्वाची कातडी पांघरली आहे. सत्तेसाठी एका राज्यात गोवध बंदी आणि दुसरीकडे नाही, अशी दुटप्पी भूमिका ते घेतात. हिंमत असेल तर देशभर एकच धोरण घेऊन पुढे चला, असे आव्हानही ठाकरे यांनी दिलं. अमित शाह म्हणाले की हिंमत असेल तर एकट्याने लढा. पण, आव्हान द्यायचे आणि इडीची पीडा लावायची हे शौर्य नाही. वापरायचे व फेकून द्यायचे ही भाजपची नीती आहे. भाजपने विश्वासघात केल्याच्या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.