BJP vs Mahavikas Aghadi: "महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली का?"; भाजपाचा रोखठोक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 18:01 IST2022-11-24T18:01:24+5:302022-11-24T18:01:57+5:30
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून सध्या महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे.

BJP vs Mahavikas Aghadi: "महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली का?"; भाजपाचा रोखठोक सवाल
BJP vs Mahavikas Aghadi: "राज्यातून उद्योग बाहेर गेल्याची आवई उठवल्यानंतर आता ४४ खेडी कर्नाटकला दिली जाणार असल्याच्या धादांत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का?" असा घणाघाती सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नेतृत्वाच्या नाकर्तेपणामुळेच बेळगाव महाराष्ट्रात येऊ शकले नाही, असेही त्यांनी नमूद केले.
"आपल्या आत्मचरित्रात एस.एम. जोशी यांनी काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाच्या नाकर्तेपणामुळे सीमा प्रश्न सुटला नाही असे अनेक उदाहरणे देऊन दाखवून दिले आहे. एकही खेडं कर्नाटकला दिले जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तरीही महाविकास आघाडीचे नेते कर्नाटक महाराष्ट्राची खेडी पळविणार असल्याचा अपप्रचार करीत आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून गुजरातला उद्योग पळवले जात असल्याचा खोटा प्रचार महाविकास आघाडीने केला होता. मात्र हा खोटेपणा तत्काळ उघडा पडला. आता कर्नाटक महाराष्ट्राची खेडी पळविणार असल्याची आवई उठवली जात आहे. या घटनांतून महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारीच घेतली आहे असे दिसते आहे. या विषयावर राजकारण करून महाविकास आघाडीने आपला संकुचितपणाच दाखवून दिला आहे," असेही केशव उपाध्ये म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले?
"सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्य करणे ताबडतोब थांबवावे. त्यांचे हे वक्तव्य निंदनीय असून त्याचा निषेध करतो. लोकांचे लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरुन हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत. सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे काय माहित. आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक शब्दात त्यांना सुनावले पाहिजे," असा सल्ला अजित पवार यांनी दिला.