युतीसाठी उत्सुक भाजपाने सेनेच्या लोकसभा क्षेत्रांत तयारी केली सुरू

By यदू जोशी | Published: December 23, 2018 07:14 AM2018-12-23T07:14:59+5:302018-12-23T07:16:04+5:30

शिवसेनेशी आमची युती होईलच, असे भाजपाचे नेते विश्वासाने सांगत असले तरी शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपाने उमेदवार शोधण्यापासून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

BJP started preparations for the Lok Sabha constituency | युतीसाठी उत्सुक भाजपाने सेनेच्या लोकसभा क्षेत्रांत तयारी केली सुरू

युतीसाठी उत्सुक भाजपाने सेनेच्या लोकसभा क्षेत्रांत तयारी केली सुरू

Next
ठळक मुद्देशिवसेनेशी आमची युती होईलच, असे भाजपाचे नेते विश्वासाने सांगत असले तरी शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपाने उमेदवार शोधण्यापासून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपा-सेनेमध्ये २०१४ साली युती होती. त्या वेळी शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या सर्वच लोकसभा मतदारसंघांत भाजपाने स्वबळावर लढण्याची चाचपणी करून, यंत्रणाही कामाला लावली आहे.

- यदु जोशी
मुंबई : शिवसेनेशी आमची युती होईलच, असे भाजपाचे नेते विश्वासाने सांगत असले तरी शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपाने उमेदवार शोधण्यापासून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपा-सेनेमध्ये २०१४ साली युती होती. त्या वेळी शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या सर्वच लोकसभा मतदारसंघांत भाजपाने स्वबळावर लढण्याची चाचपणी करून, यंत्रणाही कामाला लावली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत आमदारांना सर्वच लोकसभा मतदारसंघांत करावयाच्या कार्यक्रमांची यादी आमदारांना दिली. त्यात शिवसेनेकडील मतदारसंघांचाही समावेश आहे. अमरावतीमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ खासदार आहेत. पण पिंपरी-चिंचवडमधील भाजपाच्या नगरसेविका सीमा सावळे सध्या अमरावतीत कार्यक्रम घेत आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. सावळे यांचे माहेर बडनेराचे आहे. त्यामुळेच त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे.
युती न झाल्यास रामटेकमधून शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांना भाजपात आणून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात बंजारा मतांवर डोळा ठेवून आ. नीलय नाईक किंवा पी. बी. आडे असे दोन पर्याय भाजपाने तयार ठेवले आहेत. विरोधी पक्षाने बंजारा समाजातील उमेदवारी दिल्यास भाजपाने मराठा नाव पुढे करण्याचे ठरवले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील मराठा-कुणबी समाजातील दोन बडी नावेही भाजपाने हेरून ठेवली असल्याचे समजते. उस्मानाबादेत शिवसेनेचे रवींद्र जाधव खासदार आहेत. तेथे शिवसेनेतून भाजपात गेलेले सुधीर पाटील तसेच परभणीचे सेना आ. राहुल पाटील यांचे बंधू प्रतापसिंह पाटील, आ. सुजितसिंह ठाकूर अशी नावे भाजपाने तयार ठेवल्याचे समजते. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे सातत्याने जिंकत आले आहेत. युती न झाल्यास आ. अतुल सावे, माजी महापौर भागवत कराड, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर हे पर्याय भाजपाने तयार ठेवले आहेत.

 
उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष

कोल्हापूर, हातकणंगले व सातारा या तिन्ही जागी गेल्या वेळी सेनेचे उमेदवार होते. सातारामध्ये उदयनराजे भोसले राष्ट्रवादीबाबत काय भूमिका घेतात, याकडे भाजपाचे लक्ष आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत, पण तेथे भाजपाकडून माजी आमदार माणिकराव कोकाटे तयारीला लागले आहेत. पक्षाने अप्रत्यक्षपणे त्यांना बळ दिले आहे.

शिवसेनेचे संजय (बंडू) जाधव खासदार असलेल्या परभणीतून मंत्री बबनराव लोणीकर आपला मुलगा राहुल यांना दिल्लीत पाठविण्यास उत्सुक असल्याचे कळते. काँग्रेसमधून भाजपात आलेले माजी आ. रामप्रसाद बोर्डीकरही मुलगी मेघना हिला लोकसभेत पाठवू इच्छितात. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचे त्यांना पाठबळ असल्याचे म्हटले जाते.

Web Title: BJP started preparations for the Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.