"मला अपमानास्पद वागणूक देऊ नका"; सोमय्यांच्या पत्रावर BJP चे स्पष्टीकरण, "पक्ष कोणाला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 12:52 PM2024-09-11T12:52:15+5:302024-09-11T13:12:35+5:30
किरीट सोमय्या यांच्या नाराजीच्या पत्रावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं.
Chandrashekhar Bawankule On Kirit Somaiya : विधानसभा निवडणुकीसाठी दोन महिने शिल्लक असताना महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. भाजपनेही विधानसभेसाठी बैठका घेऊन पक्षातील नेते मंडळीला कामाच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता या जबाबदारीवरुन भाजपमध्ये धुसफूस सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी भाजपकडून व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांनाही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र सोमय्या यांनी पक्षादेश धुडकावत आपली पत्रातून आपली नाराजी व्यक्त केली. आता सोमय्यांच्या पत्रावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यतेखालील व्यवस्थापन समितीमध्ये किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती पक्षाकडून जाहीर करण्यात आली होती. मात्र, किरीट सोमय्या यांनी हे पद नाकारलं. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहीत आपला रोष व्यक्त केला. मला न विचारताच माझ्या नावाची घोषणा केली असं सोमय्यांनी म्हटलं. त्यावर आता माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. किरीट सोमय्या हे पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
“माजी खासदार किरीट सोमय्या हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र, पक्षाचे नेतृत्व हे कोणाला विचारून एखादे पद किंवा जबाबदारी देत नाही, याबाबत तसा नियमही आहे. आता कोणाला आमदारकी द्यायची असेल तर पक्ष विचारत नाही. एखादी जबाबदारी द्यायची असेल तर विचारून देत नाही. मला प्रदेशाध्यपदाची जबाबदारी देण्यात आली, मलाही पक्षाने विचारलं नाही. तुम्ही काम करा सांगितलं. शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांना पक्षाने जबाबदारी दिली. ते ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
किरीट सोमय्यांनी पत्रात काय म्हटलं?
"आपण विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला हे अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी भाजप-शिवसेनेची ब्ल्यू सी हॉटेल वरळी इथं संयुक्त पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषदेतून जाण्यास सांगितलं होतं. तेव्हापासून मी भाजपचा एक सामान्य सदस्य, कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मधल्या काळात मी ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी स्वीकारली होती. माझ्यावर तीनवेळा जीवघेणे हल्लेही झाले. तरीही मी ही जबाबदारी पार पाडली. गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात ते पुरेसे आहे. मी विधानसभा निवडणुकीसाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतोय आणि करत राहणार आहे. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण आणि प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक देऊ नये," असंही सोमय्यांनी म्हटलं आहे.