NCP मध्ये असंतोषाची मोठी यादी, २०२४ पर्यंत...; भाजपाचा शरद पवारांना सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 05:06 PM2022-11-13T17:06:11+5:302022-11-13T17:06:37+5:30

आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार असं धोरण आहे. २०२४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारही भेटणार नाहीत असं त्यांनी सांगितले. 

BJP State President Chandrashekhar Bawankule criticizes NCP, Uddhav Thackeray and Congress | NCP मध्ये असंतोषाची मोठी यादी, २०२४ पर्यंत...; भाजपाचा शरद पवारांना सूचक इशारा

NCP मध्ये असंतोषाची मोठी यादी, २०२४ पर्यंत...; भाजपाचा शरद पवारांना सूचक इशारा

Next

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता गेल्यानंतर प्रचंड अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीतील कार्यकर्ता आणि नेत्यांचा स्वभाव सत्तेशिवाय राहण्याचा नाही. प्रचंड असंतोष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०२४ मध्ये बाहेर येईल. इतकी मोठी यादी आहे की आम्हाला त्या यादीवर काम करण्यासाठी विचार करावा लागतोय असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. सांगलीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे राष्ट्रवादीचं धोरण असल्याने जिल्ह्यातील एक माणूस मोठा होता आणि तोच सगळं कमावतो. नेता मोठा होतो पण स्थानिक कार्यकर्ता हा त्याच पातळीवर राहतो. सर्वसाधारण कार्यकर्त्यांना आमदार, खासदार होता येत नाही. आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार असं धोरण आहे. २०२४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारही भेटणार नाहीत असं त्यांनी सांगितले. 

ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये खदखद 
उद्धव ठाकरेंचा प्रश्न वेगळाच आहे. गजानन किर्तीकर यांनी विदर्भ, मराठवाड्यात शिवसेना वाढवली. त्यांच्यासारखे नेते उद्धव ठाकरेंना सोडतात. ज्यांनी संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या विचारांसाठी खर्ची घातलंय ते सोडून जातायेत. हे उद्धव ठाकरेंनी विचार करण्यासारखं आहे. केवळ काँग्रेसच्या संविधानाची कॉपी काढून स्वत:च्या पक्षाला लावावी इतकेच उरले आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. ज्यांच्याविरोधात लढाई आहे त्यांच्यासोबत जाऊन बसल्याने नाराजी आहे. शिवसेनेच्या मूळ कार्यकर्त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्याकडे गेल्याशिवाय पक्ष चालवणं कठीण झाले आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं. 

४० आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले
उद्धव ठाकरेंकडील अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युती ही विचारांची आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तेला लाथ मारून जो त्रास शिवसेनेच्या आमदारांना होत होता त्याचा वाचा फोडली. विचारांच्या लढाईत राष्ट्रवादीनं जिल्हाजिल्ह्यात ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. ४० आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला स्वीकारून ४० आमदारांनी वेगळा निर्णय घेतला असंही बावनकुळेंनी सांगितले. 

मंत्रालय लोकांच्या गर्दीनं भरलं
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपानं महाराष्ट्राला नवा विचार दिला. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे दोन्हीही नेते १८ तास काम करतात. दोन्ही नेत्यांमध्ये कार्यकर्ता आहे. त्यामुळे मंत्रालयात १८ तास काम करणारे नेते भेटलेत. ज्यांना समाजाची जाण आहे. संपूर्ण राज्याचं व्हिजन आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिला नाही. मंत्रालयात आज कुणीही गेले तरी लोकांच्या गर्दीने मंत्रालय खचाखच भरलेले दिसेल असं कौतुक भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केले. 

भारत जोडो यात्रेचा घेतला समाचार
ज्या उद्देशाने राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली त्या यात्रेची फलश्रुती काही नाही. यात्रा काळात स्थानिक कार्यकर्ते नाराज होऊन भाजपात प्रवेश करतायेत. भारत जोडो यात्रेत पहिल्या दिवशीपासून आतापर्यंत बहुतांश कार्यकर्ते हे प्रवासी कार्यकर्ते आहेत. व्हिडिओ पाहिले तर राहुल गांधींपासून ४००-५०० कार्यकर्ते कॉमन आहेत असं सांगत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारत जोडो यात्रेचा समाचार घेतला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: BJP State President Chandrashekhar Bawankule criticizes NCP, Uddhav Thackeray and Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.