Bypoll Election 2023: “सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी पोटनिवडणूक लढू नये”; चंद्रशेखर बावनकुळेंची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 04:19 PM2023-02-05T16:19:17+5:302023-02-05T16:22:34+5:30
Bypoll Election 2023: कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा भाजपच्या आहेत. आमच्या जागा आमच्यासाठी सोडाव्या, असे चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले.
Bypoll Election 2023: संपूर्ण राज्याचे लक्ष पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे.
मीडियाशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडीसह राज्यातल्या सर्व पक्षांना विनंती केली आहे की, त्यांनी ही पोटनिवडणूक लढू नये. तसेच राज्यातील पोटनिवडणूक बिनविरोधाची परंपरा या नेत्यांनी जपावी, अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना केली.
सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी पोटनिवडणूक लढू नये
कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा भाजपच्या आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी फार कमी अवधी बाकी आहे. सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी पोटनिवडणूक लढू नये. आमच्या जागा आमच्यासाठी सोडाव्या, असे चंद्रशेख बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, या भाजपच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"