पोटनिवडणुकीत भाजपाला यश
By admin | Published: August 30, 2016 06:19 AM2016-08-30T06:19:36+5:302016-08-30T06:19:36+5:30
महानगरपालिका, नगरपालिका व परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाने बाजी मारली. भाजपाला एकूण ११ जागा मिळाल्या.
मुंबई : महानगरपालिका, नगरपालिका व परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाने बाजी मारली. भाजपाला एकूण ११ जागा मिळाल्या. त्यात काटोल नगर परिषदेत नऊपैकी सात जागांचा समावेश आहे. नाशिकमध्ये दोन्ही जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले, ठाण्यात मात्र दोन्ही जागांवर पक्षाला पराभवाचे तोंड पाहावे लागले.
मनसेची जादू संपली
नाशिक महानगरपालिकेच्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे कमळ फुलले. प्रभाग क्रमांक ३५मध्ये मंदा ढिकले तर प्रभाग ३६मध्ये सुनंदा मोरे विजयी झाल्या. सत्तारूढ मनसेच्या ताब्यातील या दोन्ही जागा भाजपाने जिंकल्या. मनसेचे नगरसेवक नीलेश शेलार आणि शोभना शिंदे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी मतदान केल्याने पक्षाच्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्तांनी दोघांचे सदस्यत्व रद्द ठरविले होते. सेना उमेदवारांनी कडवी झुंज दिली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुश्की ओढवली.
काटोलमध्ये सात जागांवर भाजपा
काटोल नगर परिषदेच्या पाच प्रभागांतील नऊ जागांपैकी सात जागांवर भाजपाने विजय मिळविला. शेकापला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकांना अपात्र ठरविल्यानंतर ही पोटनिवडणूक झाली.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेच्या एका जागेवर नगराध्यक्ष आसिफ मोकाशी गटाच्या अश्विनी काशिद विजयी झाल्या. नगराध्यक्ष आसिफ मोकाशी यांना शिवसेना
आ. सत्यजीत पाटील यांचा पाठिंबा आहे.
अकोला जि.प.मध्ये भारिप : अकोला जिल्हा परिषदेच्या हातगाव सर्कलमध्ये भारिप बहुजन महासंघाने जागा कायम राखली. अकोला जिल्हा परिषदेवर ‘भारिप-बमसं’ची सत्ता आहे.
औरंगाबादमध्ये भगवा अन् घड्याळ
बेगमपुरा वॉर्डात पुन्हा सेनेचा भगवा फडकला. युतीचे उमेदवार सचिन खैरे ७२३ मतांची विक्रमी आघाडी घेऊन विजयी झाले. बुढीलेन वॉर्डात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारून ‘एमआयएम’ उमेदवाराचा दारुण पराभव केला. राष्ट्रवादीच्या परवीन कैसर खान यांनी ३१६ मतांची आघाडी घेतली. लातूर महापालिका प्रभाग क्रमांक २ (अ)मध्ये काँग्रेसचे रमेशसिंह बिसेन ७३६ मतांनी विजयी झाले.