Maharashtra Politics: बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देणार का? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 04:03 PM2023-02-09T16:03:28+5:302023-02-09T16:05:15+5:30
Maharashtra Politics: महात्मा गांधींची काँग्रेस विसर्जित होण्याच्या मार्गावर आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असून, पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा आहे. यानंतर बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट भाष्य केले आहे.
भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ येथे पोटनिवडणूक होत आहे. भाजप नेते हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यात प्रमुख लढाई होण्याची शक्यता आहे. हेमंत रासने यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. भाजपने केसरीवाड्यातून प्रचारासाठी प्रचार यात्रा काढली. यावेळी सुधीर मुनगंटीवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. मीडियाशी बोलताना सुधीर मुनगंटीवार बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीसंदर्भात प्रतिक्रिया दिली.
बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देणार का?
बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला आता भाजप प्रवेशाची ऑफर मिळते का आणि मिळाली तर थोरात ती स्वीकारणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यावर बोलताना, काँग्रेसमधील वादाचा आम्ही फायदा घेणार नाहीत. बाळासाहेब थोरात यांना आम्ही आमच्या रस्त्यावर आणणार नाहीत. त्यांनी कुठे जायचेय, हा निर्णय त्यांनी स्वतःच घ्यायचा आहे. पण काँग्रेस आता अधःपतनाला लागली आहे. महात्मा गांधी यांची काँग्रेस विसर्जित होण्याच्या मार्गावर आहे, अशी घणाघाती टीका मुनगंटीवार यांनी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदा भावनेवर आधारीत असतात. मुंबई तोडणार, असा लोकांमध्ये फक्त भ्रम निर्माण केला जात आहे. पण प्रत्यक्षात मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापामध्ये नाही. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या हातातून सर्वकाही निसटलेय, त्यामुळे ते अशी निराशाजनक वक्तव्ये करतात, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"