Maharashtra Political Crisis: “शिक्षण पद्धतीचा दोष, अर्थ काढायची क्षमता विकसित...”; मुनगंटीवारांचे आव्हाडांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 12:32 PM2022-08-16T12:32:13+5:302022-08-16T12:33:21+5:30
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून निर्णय घेतला आहे. कोणत्या पक्षांचे काय म्हणणे आहे हे गौण आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून काही ना काही कारणांवरून विरोधक सातत्याने टीका करत असून, एकामागून एक वाद वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात एकही महिला नेत्याला स्थान न दिल्यामुळे विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरले होते. आता सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी घेतलेल्या एका निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या टीकेला मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा आवळू नका, असा इशारा देत कोणी काय खावं, काय घालावं, काय बोलावे हे तुम्ही ठरवणार का? असा सवाल करत आम्ही तसे म्हटले नाही, तर जेलमध्ये टाकणार का? अशी विचारणाही जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. याला सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हॅलो शब्द १८ व्या शतकात आला. आश्चर्य व्यक्त करणे असा त्याचा अर्थ होतो. इंग्रजांची ही आठवण पुसून काढली पाहिजे. आपल्या मराठी पुस्तकात वंदे मातरमचे सुंदर वर्णन करण्यात आले आहे. देवाच्या मुखातून निघालेल्या वेद मंत्रापेक्षा देशभक्ताच्या ओठातून निघालेले वंदे मातरम् प्राणप्रिय आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
श्वास आणि इतके मोठे शब्द वापरण्याची गरज नव्हती
हे अभियान आहे. कोणत्याही व्यक्तीला कायदा करुन आम्ही जेलमध्ये टाकू असे सांगितलेले नाही. हा आपल्या शिक्षणपद्धतीचा दोष आहे की, योग्य अर्थ काढण्याची क्षमता आपण विकसित करु शकलो नाही. हॅलो शब्दाला पर्यायी शब्द म्हणून वंदे मातरम् वापरावे इतकेच म्हटले आहे. यामध्ये श्वास आणि इतके मोठे शब्द वापरण्याची गरज नव्हती, असा पलटवार मुनगंटीवार यांनी आव्हाडांच्या टीकेला उत्तर देताना केला.
राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही
शिवसेनेकडे जी खाती होती ती त्यांच्याकडे आहेत. भाजपाने चांगली खाती घेतली असं म्हणण्याला काही अर्थ नाही. भाजपाकडे जी खाती आहेत, ती शिवसेनेने विचारपूर्वक, चिंतन करुन काँग्रेस, राष्ट्रवादीला दिलेली खाती आहेत. तेव्हा तेही सरकारमध्ये दुसऱ्या भूमिकेत होते आणि सध्या आम्ही आहोत. शिवसेनेने यावर टीका करणे म्हणजे आपल्याकडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही म्हणत निंदा करुन घेण्यासारखे आहे, अशी बोचरी टीका सुधीर मुनगंटीवारांनी केली.
दरम्यान, जे विरोध करत असतील त्यांच्याशी संवाद साधू, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करु. हा काही जातीय, धर्मांध शब्द नाही. मी महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात हे अभियान चालवायचे आहे. शिवसेनेचे किंवा इतर कोणत्या पक्षांचे काय म्हणणे आहे हे गौण आहे, असा टोला मुनगंटीवारांनी लगावला.