“उद्धव ठाकरे राजकारणात राहून काय करणार? खोटे बोलण्याचा मूळ स्वभाव...”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 05:39 PM2023-05-25T17:39:09+5:302023-05-25T17:44:20+5:30
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आमदार टिकवता येत नाहीत. ना जनतेचा विश्वास संपादन करता येत, ना जनतेचा विकास करता येत, अशी टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि सत्ताधारी भाजप-शिवसेना शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचा भाजप नेते खरपूस शब्दांत समाचार घेत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे राजकारणात राहून काय करणार, असा सवाल करत भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकारणात राहण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात सापनाथ-नागनाथ एकत्र झाले तरी नरेंद्र मोदींचा पराभव करू शकणार नाहीत, असे विधान करत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले होते. त्यावर बोलताना नागनाथ-सापनाथ यांची इथे पूजा केली जाते. तुम्ही हिंदू आहात ना? अशी विचारणा संजय राऊतांनी उपस्थित केली होती. यावर पुन्हा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे राजकारणात राहून काय करणार?
उद्धव ठाकरेंना पक्षाचे आमदारही टिकवता येत नाहीत. यांनी खरेतर राजकारणात राहून काय करायचे? ना जनतेचा विश्वास संपादन करता येत, ना जनतेचा विकास करता येत. शिवसेनेत ४० आमदार फुटतात, काहीतरी दोष असेल ना? तुमचा काहीच दोष नाही का? विचारांचा दोष नक्कीच नाही, दोष तुमच्या कृतीचा आहे. आचरणाचा आहे. तुम्ही ज्या वृत्तीने वागता त्याचा दोष आहे. विश्वासाने सांगतो की, यांचे बरेच आमदार आता बाहेर निघतील. कारण यांच्या स्वभावाला कुणी टिकूच शकत नाही, अशी घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
दरम्यान, शाब्दिक कोट्या करण्यात काही अर्थ नाही. उद्धव ठाकरे दोन वर्षं आठ महिने राज्याचे मुख्यमंत्री होते. काय केली त्यांनी राज्याची अवस्था? आर्थिक अवस्था वाईट आहे. लोकांशी खोटे बोलायचे, शेतकऱ्यांशी खोटे बोलायचे. हा यांचा मूळ स्वभाव आहे. यांची जुनी भाषणे काढा. म्हणाले २५ वर्षं आम्ही भाजपबरोबर सडलो आणि पुन्हा भाजपसोबत युती केली, असा पलटवार मुनगंटीवार यांनी केला.