Sujay Vikhe Patil: "सर्वात आधी PM मोदींचा फोटो वापरून गद्दारी कोणी केली?"; सुजय विखेंचा Uddhav Thackeray यांना रोखठोक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 05:55 PM2022-07-30T17:55:36+5:302022-07-30T17:57:26+5:30
"शरद पवार शिवसेनेला संपवतील म्हणणारा मी पहिला खासदार"
Sujay Vikhe Patil slams Uddhav Thackeray: महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत धुसफुसीमुळे अखेर जून महिन्याच्या अखेरीस शिवसेनेत दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांना साथीला घेऊन बंडखोरी केली आणि भाजपासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापना केली. या सत्तास्थापनेच्या वेळी आणि त्यानंतरही शिंदे गट सातत्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना आणि त्यांच्या विचारांवर चालत असल्याचा पुनरूच्चार करताना दिसतो. मात्र, 'गद्दारांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो किंवा नाव वापरून मतं मागू नये', असा विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत बोलून दाखवला. त्यानंतर, भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी उद्धव यांना जळजळीत सवाल केला आहे.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गद्दार म्हणणे किंवा न म्हणणे यावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह आहेत. "शिवसेनेतील शिंदे गटावर गद्दारीचा आरोप केला जातो, पण पहिली गद्दारी कुणी केली? भाजपा सेनेची युती होती, तेव्हा पंतप्रधान नरेंद मोदींचा फोटो वापरुन कोण निवडून आले? आणि मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपला सोडून काँग्रेस-राष्टवादीशी कोणी युती केली? मग पहिले गद्दार नक्की कोण?" असे रोखठोक सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. ते अहमदनगरच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
"राष्ट्रवादीचे शरद पवार हे शिवसेनेला संपवतील हे म्हणणारा मी पहिला खासदार होतो. ४० आमदारांना शिवसेना सोडून का जावे लागले? त्यात ८ कॅबिनेट मंत्री होते. मुख्यमंत्री सेनेचा असतानाही सेनेच्या आमदारांना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे निधीसाठी जावे लागl होते. आता शेतकरी, जनतेच्या हितासाठी शिंदे-फडणवीस सरकार बनले आहे. भाजपा हा त्याग करणारा पक्ष आहे. पक्षाचे १०६ आमदार असतानाही ४० आमदार असलेल्या गटाचा मुख्यमंत्री भाजपाने करुन दाखविला. पंतप्रधानपदी जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत देश सुखी राहील", यावरही सुजय विखे यांनी जोर दिला.