गुणरत्न सदावर्तेंना भाजपाचं पाठबळ, राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्यांकडून हल्ल्याचं समर्थन: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 12:02 PM2022-04-09T12:02:35+5:302022-04-09T12:03:55+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या हल्ल्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज थेट भाजपावर निशाणा साधला आहे.
मुंबई-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या हल्ल्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज थेट भाजपावर निशाणा साधला आहे. "पवारांच्या घरावर झालेलं आंदोलन नव्हतं. तो हल्ला होता आणि त्यात एसटीचे कर्मचारी नव्हते. यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे याची कल्पना सर्वांनाच आहे. याची पाळंमुळं गृहमंत्र्यांनी शोधून काढावीत. भाजपानं नवनिर्माण केलेला गुणरत्न सदावर्ते याला भाजपाचं पाठबळ आहे. तो कुठे राहतो. कुणाच्या घरात राहतो. आर्थिक रसद कोण पुरवतं याची कल्पना सर्वांना आहे. कालचा हल्ला हा त्याचाच एक भाग होता", असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आज 'सिल्वर ओक'वर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. संजय राऊत यांनी यावेळी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनाही लक्ष्य केलं. "ज्या प्रकारच्या भाजपाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या हे बोलणारे कोण होते? जे कालपर्यंत राष्ट्रवादीत होते ते आज भाजपात गेले. ते पवारांविरोधात बोलत होते. कालच्या हल्ल्याचं समर्थन करत होते. हा हलकटपणा आहे. ज्या पक्षानं तुम्हाला मोठं केलं. पवारांनी मोठं केलं. तुम्ही काय मुळचे भाजपावाले आहात का? हे पाप तुम्ही कुठं फेडणार आहात?", असं संजय राऊत म्हणाले.
सदावर्तेंना भाजपाकडून आर्थिक पाठबळ
"आता सुद्धा हा जो कोणी भाजपाचा एक नवनिर्माण केलेला नेता आहे. सदावर्ते. त्याला संपूर्ण पाठिंबा भाजपाचा आहे. तो कुठे राहतो? कुणाच्या घरात राहतो? त्याला आर्थिक पाठबळ कोण पुरवतं? त्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात गरळ ओकण्यासाठीच ठेवलेलं आहे. कालचा हल्ला त्याचाच एक भाग होता. हे आम्ही जो तपास करत आहोत त्यातून सिद्ध झालं आहे", असं संजय राऊत म्हणाले.