मराठा समाजासाठी संभाजीराजे छत्रपतींच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 03:15 PM2022-02-15T15:15:54+5:302022-02-15T15:19:50+5:30
Chandrakant Patil : मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भाजपा पूर्ण पाठिंबा देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात सांगितले.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 26 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. दरम्यान,संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपाने पाठिंबा दिला आहे. संभाजीराजेंच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भाजपा पूर्ण पाठिंबा देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात सांगितले.
मराठा समाजासाठी भाजपाच्या झेंड्याखाली आंदोलन सुरू केले तर त्याला राजकीय वळण येईल. त्यामुळे भाजपा असे आंदोलन करणाऱ्या मान्यवरांना पूर्ण पाठिंबा देईल, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, जे ओबीसींना ते मराठा समाजाला असे सूत्र वापरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व रोजगाराच्या अनेक सवलती दिल्या तसेच आरक्षणही दिले. मात्र, महाविकास आघाडी सरकारमुळे आरक्षण गमावले तसेच मराठा समाजासाठी भाजपा सरकारने चालू केलेल्या योजनांची अंमलबजावणीही होत नाही, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी सारथी संस्था सुरु केली, मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थींनींची निम्मी फी भरली व त्यासाठी 785 कोटी रुपये खर्च केले, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून युवक युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी दहा लाख रुपये कर्जाची योजना सुरू केली, मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतीगृहे सुरू केली. आज हे सर्व बंद आहे. त्यामुळे आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे किंवा राजे समरजितसिंह घाटगे अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार- संभाजीराजे
मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण द्यावे म्हणून संभाजीराजे यांनी राज्यात आंदोलन उभारले आहे; परंतु कोरोना संसर्गामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविली नव्हती, तरीही मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्याबाबत त्यांनी समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचारविनिमय केला. त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत सोमवारी मुंबईत आपली पुढील दिशा जाहीर केली. यावेळी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 26 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे.