नाशिक पदवीधर निवडणुकीत BJP चा सस्पेन्स कायम; प्रदेशाध्यक्ष म्हणाले, शेवटच्या क्षणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 02:55 PM2023-01-28T14:55:13+5:302023-01-28T14:55:44+5:30
या निवडणुकीत भाजपाने अद्याप कुणालाही पाठिंबा दिला नाही.
मुंबई - नाशिक पदवीधर निवडणुकीत प्रचाराचा शेवटचा दिवस आला तरी भाजपानं सस्पेन्स कायम ठेवला आहे. या निवडणुकीत रंगतदार घटनाक्रम पाहायला मिळाला. काँग्रेसनं एबी फॉर्म दिलेला असतानाही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. तर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरत काँग्रेसपासून लांब गेले. त्यात भाजपाने या मतदारसंघात कुणालाही अधिकृत उमेदवारी दिली नाही. त्यामुळे सुरुवातीपासून नाशिक पदवीधर निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत भाजपाने अद्याप कुणालाही पाठिंबा दिला नाही. त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाशिकमध्ये अपक्षांची लढाई आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार उभे आहेत. महाविकास आघाडीचाही उमेदवार नाही. त्यांनीही अपक्षाला पाठिंबा दिला आहे. भाजपानं या निवडणुकीत शेवटच्या २४ तासांतही निर्णय घेतला की यांना समर्थन द्यायचं आहे तर आमचा पक्ष तयार आहे. मतदारही तयार आहे त्यामुळे पहिलं करावं की आता करावं असं काही नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मला घोषणा करायची गरज नाही. मी काल भाजपा पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर स्थानिक नेत्यांनी एकमताने निर्णय करावा आणि मतदान करावं असं सांगितल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
सत्यजित तांबेचाच विजयी होईल - समर्थक
पदवीधरांच्या खूप अपेक्षा आहेत. सुधीर तांबे यांनी शिक्षकांचे प्रश्न मांडले. आता त्यांचाच वारसा घेऊन सत्यजित तांबे पुढे चालले आहेत. चळवळीतून तांबे कुटुंब पुढे आले आहे. पदवीधरांचे प्रश्न निश्चित सोडवले जातील. सत्यजित तांबे तरूण आहेत. आधुनिककरणाची जोड असल्याने सत्यजित तांबे मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास तांबे समर्थकांनी व्यक्त केला.
विजय माझाच होणार - शुभांगी पाटील
मी ज्या पक्षात त्याच पक्षाची आहे. माझा विजय होणार आहे. पदवीधर मतदार माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत आहेत. त्यामुळे निवडणुकीत पहिल्या पसंतीचे मत मलाच मिळून माझा विजय होईल असा विश्वास महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे.