“उद्धवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठ कर”; व्यंगचित्रातून भाजपचा सेना-राष्ट्रवादीला खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 06:29 PM2022-05-12T18:29:44+5:302022-05-12T18:30:35+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने शरद पवार आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
मुंबई: १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी एक टीझर जारी केला होता. तसंच आता त्यांनी एक पोस्टरही जारी केले आहे. ‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व’ असल्याचे शिवसेनेने त्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने सणसणीत टोला लगावला आहे.
आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, तर १४ तारखेला सभा घेतोच आहे. पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असे नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझे काही तुंबलेले नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, असे उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते. यानंतर आता शिवसेनेने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला असून, यावर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला आहे. तसेच ही सभा कुठे आणि किती वाजता आयोजित करण्यात आली असून ‘यायलाच पाहिजे’ असंही त्यावर नमूद करण्यात आलेय. यानंतर आता भाजपने शिवसेनेला टोला लगावला आहे.
उद्धवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठ कर
भाजपने अधिकृत ट्विटर हँडलवरून शिवसेना पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून चिमटा काढला आहे. भाजपने ट्विटरवर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे व्यंगचित्र शेअर केले आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर टीव्ही दाखवण्यात आला असून त्यावर, हिंदुत्वाचा खरा विचार ऐकण्यासाठी आलंच पाहिजे, अशी बातमी सुरु आहे. तर दुसरीकडे शरद पवार उद्धव ठाकरेंना स्क्रिप्ट व्यवस्थित पाठ कर सांगत असून, त्यावर ते होय साहेब असे उत्तर देत असताना दाखवले आहे. या व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंच्या तोंडी शरद पवारांची भाषा असते असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यान, आणखी दोन वर्ष आम्ही गुण्यागोविंदाने पार करू. २०२४ मध्ये महाविकास आघाडी परत एकदा निवडून येईल. भाजपचे सत्तेत येण्याचे स्वप्न पूर्णपणे भंग झालेले आहे. वास्तविक शिवसेना वेगळा पक्ष आहे त्याची वेगळी विचारसरणी आहे. २०१९ मध्ये किमान-समान कार्यक्रमाच्या आधारावर आम्ही एकत्र आलो. महाविकास आघाडी सरकारला लोकांनी स्विकारले. यामुळे महाराष्ट्र पुनश्च प्रगतीपथावर आले आणि म्हणूनच भाजपच्या पोटात दुखत असल्याने वारंवार कुठल्या न कुठल्या कारणाने सरकार पडण्याची भविष्यवाणी करत आहेत, असे प्रत्युत्तर राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.