भाजपा थापाड्यांचा पक्ष
By admin | Published: October 10, 2015 01:25 AM2015-10-10T01:25:59+5:302015-10-10T01:25:59+5:30
केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅकेजची घोषणा करणाऱ्यांना गेले वर्षभर विकासाचा विसर पडला होता. आता निवडणुकीच्या तोंडावर पाकीट वाटत फिरत आहेत. वाटेल ती आश्वासने
कल्याण : केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅकेजची घोषणा करणाऱ्यांना गेले वर्षभर विकासाचा विसर पडला होता. आता निवडणुकीच्या तोंडावर पाकीट वाटत फिरत आहेत. वाटेल ती आश्वासने देऊन नागरिकांची फसवणूक करणारा भाजपा हा थापाड्या पक्ष असून, त्याच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणात केले.
स्पोटर््स कॉम्प्लेक्सच्या सभागृहात मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ठाकरे बोलत होते. ‘राज्यात नवीन सरकार येऊन कोणताही फरक पडलेला नाही. जे काँग्रेसवाले करायचे, तेच आता भाजपा करीत आहे. ‘१०० दिवसांत अच्छे दिन’ येणार होते, पण हाताला काहीच लागले नाही. आधी काँग्रेसने लुटले, परंतु भाजपाने तर एका वर्षातच लुटले. दुष्काळ जाहीर न करता, दुष्काळ निवारण करासाठी लुटालूट सुरू केली आहे. दुष्काळ तर जाहीर करा, मगच पेट्रोल, डिझेलचे दर वाढवा,’ असा आरोप त्यांनी केला. ‘कल्याण-डोंबिवलीत लुटताना एकत्र होते, आता वेगळे होऊन एकमेकांना शिव्या घालत आहेत,’ अशा शब्दांत ठाकरे यांनी शिवसेनेवरही तोफ डागली, तसेच पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवरही टीका केली. भाजपातील जातीपातींना खतपाणी घालणाऱ्यांपासून सावध रहा. २० आॅक्टोबरनंतर चार ते पाच जाहीर सभा घेणार आहे. विकले जाऊ नका व विकले गेल्यास नोटा खऱ्या आहेत की नाही, ते तपासून घ्या,’ असा टोला ठाकरेंनी हाणला. (प्रतिनिधी)
अॅपची योजना राबविणार!
‘नाशिकचा सर्व कारभार मी अॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविला आहे. त्यामुळे नागरिकांना पालिकेचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. अशीच योजना कल्याण-डोंबिवलीत राबविण्याची माझी योजना आहे,’ असे ते म्हणाले.