भाजपा महाराष्ट्रात काढणार धन्यवाद यात्रा; देवेंद्र फडणवीसच राज्यात नेतृत्व करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 01:03 PM2024-06-19T13:03:21+5:302024-06-19T13:04:31+5:30

राज्यातील भाजपा नेत्यांची दिल्लीत पक्षनेतृत्वासोबत बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निकालांचा आढावा घेण्यात आला. त्यासोबत जागा कमी झाल्याबाबतही चर्चा झाली. 

BJP to take out Dhanyawad Yatra in Maharashtra; Devendra Fadnavis will lead the state - Chandrasekhar Bawankule | भाजपा महाराष्ट्रात काढणार धन्यवाद यात्रा; देवेंद्र फडणवीसच राज्यात नेतृत्व करणार

भाजपा महाराष्ट्रात काढणार धन्यवाद यात्रा; देवेंद्र फडणवीसच राज्यात नेतृत्व करणार

मुंबई - लोकसभा निकालात पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करण्याची विनंती पक्षनेतृत्वाला केली होती. परंतु पक्षनेतृत्वासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी विनंती अमान्य केली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून तेच राज्याचे नेतृत्त्व करतील. सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

नागपूर विमानतळावर चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते, तेव्हा ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या महाराष्ट्र विकासाच्या योजना त्या महाराष्ट्रात आणण्यासाठी महायुतीचे सरकार काम करेल. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आवश्यक आहेत. ज्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अर्धा टक्केपेक्षा कमी मतांनी मागे राहिला, त्याविषयी केंद्रीय नेतृत्वासोबत कारणांची चर्चा व विचार विनिमय केला. जेथे कमी पडलो आहोत, त्या ठिकाणी अधिकचे काम करून विधानसभेत ही पोकळी भरून काढण्यासाठी काम करू असंही त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा

लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजपा धन्यवाद यात्रा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील ५ वर्षात होणारी विकासकामे व योजनांचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हायला हवा. महाराष्ट्रातील सर्व आमदार-खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी जुलै महिन्यात धन्यवाद यात्रा काढणार आहे, ज्या मतदारांकडे आम्ही मत मागण्यासाठी जाऊ त्यांना मोदी सरकारच्या नवीन योजना देखील पोहचवणार आहोत असंही बावनकुळे यांनी सांगितलं. 

दरम्यान, नाना पटोले इतक्या खालच्यास्तराला गेले आहे की शेतकऱ्याला पाय धुवायला लावत आहे. महाराष्ट्राला अशोभनीय प्रकार आहे. इंग्रजांच्या काळात ज्या पद्धतीने देश गुलामगिरीत होता, काँग्रेसने पुन्हा इंग्रजांचा काळ आणला आहे. इंग्रजांच्या काळातील जी मानसिकता होती, ती नाना पटोले यांनी स्वीकारली आहे. नाना पटोले यांनी त्यांच्या पदाचा आणि व्यक्ती म्हणून स्वतःचा देखील अपमान केला आहे. नाना पटोले यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असा टोला बावनकुळे यांनी पटोलेंना लगावला. 

 

Web Title: BJP to take out Dhanyawad Yatra in Maharashtra; Devendra Fadnavis will lead the state - Chandrasekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.