उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे टोनी सिरवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 05:08 PM2021-06-16T17:08:33+5:302021-06-16T17:09:41+5:30
महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना उमेदवार कुलवंत सोहतो यांनी अर्ज मागे घेतल्याने, भाजपचे टोनी सिरवानी यांची सभापती पदी बिनविरोध निवडून आले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना उमेदवार कुलवंत सोहतो यांनी अर्ज मागे घेतल्याने, भाजपचे टोनी सिरवानी यांची सभापती पदी बिनविरोध निवडून आले. तर प्रभाग समिती सभापती पदावर शिवसेना-ओमी टीमचे वर्चस्व राहिले असून स्थायी समिती सभापती पदावरून सत्ताधारी शिवसेना आघाडीला धक्का बसला. महापालिकेत उपमहापौर व स्थायी समिती सभापती पद भाजप-रिपाइं आघाडीकडे आहे.
उल्हासनगर महापालिका स्थायी व प्रभाग समिती सभापती पदे आपल्याकडे राखण्यासाठी शिवसेना-ओमी कलानी टीम व भाजप-रिपाई आघाडी आमनेसामने उभी ठाकली होती. स्थायी समिती मध्ये भाजप-रिपाइंचे बहुमत असल्याने पक्षाचे टोनी सिरवानी निवडून येणार असल्याचे स्पष्ट चित्र होते. गेल्या वर्षीप्रमाणे पक्षाचे स्थायी समिती सदस्य फुटू नये म्हणून माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, कुमार आयलानी यांनी निवडणुकी आदी समिती सदस्यांना भूमिगत केले होते. स्थायी समिती मध्ये भाजपचे-८, रिपाइं-१, शिवसेना-५, राष्ट्रवादी-१ व साई पक्षाचा-१ असे एकून १६ सदस्य असून १६ पैकी भाजप-रिपाइंचे ९ सदस्य आहेत. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप-रिपाइं आघाडीकडून टोनी सिरवानी तर शिवसेना आघाडीकडून कलवंत सोहतो यांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभापती निवडणुकी पूर्वी शिवसेनेचे कलवंत सोहतो यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, निवडणूक पीठासीन अधिकारी यांनी टोनी सिरवानी यांना सभापती पदी निवडून आल्याचे घोषित केले. यावेळी महापालिकेबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
महापालिका प्रभाग समिती क्रं-१ च्या सभापती पदासाठी भाजप कडून मीना कौर लबाना तर शिवसेनेकडून अंजना म्हस्के व ओमी टिम कडून हरेश जग्याशी यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अंजना म्हस्के यांनी अर्ज मागे घेतल्यावर मतदान झाले. ओमी टीमचे हरेश जग्यासी सभापती पदी निवडून आले. तर प्रभाग समिती क्रं-२ च्या सभापती पदी ओमी टीमच्या छाया चक्रवर्ती सभापती निवडून आल्या. त्यांनी भाजपचे महेश सुखरामनी यांचा पराभव केला. प्रभाग समिती क्रं-३ च्या सभापती पदी साई पक्षाच्या दीप्ती दुधानी निवडून आल्या त्यांनी भाजपचे रवी जग्यासी यांना पराभूत केले. प्रभाग समिती क्रं-४ च्या सभापती पदी शिवसेनेचे विकास पाटील निवडून आले. त्यांनी भाजप समर्थक सुमन सचदेव यांचा पराभव केला. एकून ४ प्रभाग समिती सभापती पदा पैकी २ सभापती पदे ओमी टीमकडे तर शिवसेना व साई पक्षाकडे प्रत्येकी एक प्रभाग समिती सभापती पद आले.
उपमहापौर भगवान भालेराव यांनी बिघडविले शिवसेनेचे गणित?
महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना आघाडी सोबत असलेले रिपाइंचे गटनेता व उपमहापौर भगवान भालेराव यांनी स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीपूर्वी भाजप आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. येथेच शिवसेनेचे राजकीय गणित बिघडून स्थायी समिती सभापती पद हातून गेले असून भाजपाला राजकीय बळ मिळाल्याचे बोलले जाते. महापालिका निवडणुकीत असेच राजकीय गणित राहिल्यास शिवसेना आघाडीला सत्तेसाठी मोठी मजल मारावी लागणार आहे. यामध्ये साई व ओमी टीमची भूमिकाही महत्वपूर्ण राहणार आहे.