शिवसेना आमदारांनी बंडासाठी आताचीच वेळ का निवडली? उदयनराजेंनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 01:48 PM2022-06-22T13:48:25+5:302022-06-22T13:49:19+5:30
एकनाथ शिंदेंना ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा
Eknath Shinde Shivsena Udayanraje Bhosale: एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विरोधात बंड पुकारले. शिवसेनेचे सुमारे ३० पेक्षा जास्त आमदार यांचं समर्थन घेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. मंगळवारी शिंदे समर्थक आमदार सुरतच्या ला मेरेडियन हॉटेलमध्ये होते. त्यानंतर बुधवारी या सर्वांना विशेष विमानाने आसाममधील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये हलवण्यात आले. शिंदे यांच्या समर्थनार्थ जवळपास ४० आमदार आहेत आणि आणखी १० आमदार येणार असल्याचे स्वत: एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धोका निर्माण झाला असल्याची चिन्हे आहेत. शिवसेना आमदार नाराज असल्याने त्यांनी हे मोठे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहेत. शिवसेना आमदारांनी बंडासाठी आताचीच वेळ का निवडली असावी, याबद्दल राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी वक्तव्य केले.
"पक्षाचे प्रमुख जे निर्णय घेतात त्यावर मी भाष्य करणार नाही. पण पक्षप्रमुखांनी आधीच विचार करायला हवा होता की जर आपण अशी आघाडी केली तर ती गोष्ट किती दिवस टिकेल? आता हळूहळू विविध पक्षाचे आमदार नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत. अनेक आमदारांना वेळ दिला जात नाही, त्यांची कामं होत नाहीत. असं होत असताना आता अनेक महापालिका निवडणुकांच्या टर्म संपत आल्या आहेत. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे बहुतांश ठिकाणचे विरोधक हे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे आहेत. अशा वेळी अशी आघाडी किती वेळ जुळेल? हे त्यांना समजलं पाहिजे होतं", अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी एकनाथ शिंदेच्या बंडखोरीच्या 'टायमिंग'वर भाष्य केलं.
"आजची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. गेल्या दोन वर्षांपासून जे सुरू होतं, ती खदखद आता स्पष्टपणे दिसून आली आहे. ज्या वेळी एका विचाराने, ध्येयाने, ताकदीने लोकं प्रेरित होतात, त्यावेळी त्यांना कोणत्याही आमिषाची गरज नसते. पण भिन्न मतप्रवाहाचे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा सत्तास्थापना हेच उद्दिष्ट्य असते. आणि अशा वेळी त्या लोकांना एकत्र ठेवण्यासाठी सातत्याने आमिषे दाखवावी लागतात. त्यातलीच ही परिस्थिती आहे", असेही उदयनराजे म्हणाले.