“दिल्लीत ताटकळत ठेवले असे म्हणणे योग्य नाही”; उदयनराजे यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 01:09 PM2024-03-28T13:09:37+5:302024-03-28T13:09:53+5:30
Udayanraje Bhosale News: पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगायचे ते सांगितले आहे. कार्यकर्त्यांकडून झालेले जंगी स्वागत हे शक्तिप्रदर्शन किंवा कुणालाही इशारा नाही, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.
Udayanraje Bhosale News: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून उमेदवारी मिळावी, यासाठी उदयनराजे आग्रही आहे. यासाठी उदयनराजे यांनी अनेकदा दिल्लीवारी केली आहे. उदयनराजे यांना पक्षश्रेष्ठींनी तासन् तास वाट पाहायला लावली, असा आरोप विरोधकांकडून भाजपावर केला जात आहे. उदयनराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास सांगितले जात आहे, असे म्हटले जाते. मात्र, उदयनराजे कमळ चिन्हावरच लढण्यास ठाम आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उदयनराजे यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उदयनराजे आमच्यासाठी प्रिय आहेत, आदर्श आहेत. सन्माननीय व्यक्ती आहेत. शाहू महाराज यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली, तेव्हा एका मिनिटांत निर्णय घेतला आणि उमेदवारी जाहीर केली. आमचे निर्णय आम्ही महाराष्ट्रात घेतो. आम्हाला दिल्लीत निर्णयासाठी चार चार दिवस जाऊन कोणाच्या लॉनवर बसावे लागत नाही, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्यासंदर्भात केली. यावर उदयनराजे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती.
दिल्लीत ताटकळत ठेवले असे म्हणणे योग्य नाही
महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाली, ही चांगली बाब आहे. प्रत्येक पक्षात काही ना काही अडचणी असतात. वाटाघाटी करत असताना प्रत्येकाला असे वाटत असते की आपला पक्ष वाढला पाहिजे. महायुतीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या सगळ्यांच्या संगनमताने निर्णय होत असतात. त्यामुळे ताटकळत ठेवले असे म्हणणे योग्य नाही, या शब्दांत उदयनराजे यांनी पलटवार केला. तसेच माझे याअगोदरही दिल्लीत दौरे सुरूच होते. मधल्या काळात जरा दिल्लीला जावे लागले. केवळ आपल्या सातारा आणि महाराष्ट्राची निवडणूक नाही. वेगवेगळ्या पक्षांमध्ये तेढ निर्माण झाली होती. महायुतीत तेढ निर्माण झाली, पण ते सोडवण्याचे काम आता झालेले आहे, असे उदयनराजे यांनी सांगितले.
दरम्यान, उदयनराजे यांची दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी बैठक पार पडली. ही बैठक सकारात्मक ठरली. त्यांना साताऱ्यातून लोकसभेच्या जागेवर उमेदवारी मिळाल्याचे जवळपास निश्चित झाले, असे म्हटले जात आहे. त्यामुळे उदयनराजे दिल्लीहून साताऱ्यात आले तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.