“अमित शाहांसोबत २० मिनिटे चर्चा, निकालानंतर उद्धव ठाकरेंनी दगाफटका केला”: रावसाहेब दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 02:12 PM2024-03-08T14:12:46+5:302024-03-08T14:15:29+5:30
BJP Raosaheb Danve News: मातोश्रीवर त्यावेळेस नेमके काय घडले, याबाबत सविस्तर सांगताना रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
BJP Raosaheb Danve News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करत आहेत. मेळावे, बैठकांचे सत्र सुरू आहे. एका सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा अमित शाहांवर टीका करत, अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असे शपथेवर म्हटले आहे. यावरून आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून देण्यात आलेल्या शब्दाबाबत जे भाष्य केले, त्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी मातोश्रीवर नेमके काय घडले, हे रावसाहेब दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले. जागावाटपाची चर्चा झाली, त्यावेळी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष होतो. चर्चेसाठी अमित शाह यांच्यासह मी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील मातोश्रीवर गेलो होतो. शिवसेनेचे काही पदाधिकारी आले होते. मातोश्रीवर चर्चा आणि चहापाणी झाल्यानंतर उद्धव ठाकरे सहजपणे अमित शाह यांना म्हणाले की, आपण जरा आत बसू. ते आत गेले आणि २० मिनिटे चर्चा केली. बाहेर आल्यावर ते एवढेच म्हणाले की, आमचे ठरले आहे आपण आता पत्रकार परिषद घेऊ. पत्रकार परिषदेत कुणी किती जागा लढवायच्या, तसेच लोकसभा आणि विधानसभेत आमची युती राहणार एवढेच बोलायचे ठरले होते, अशी माहिती दानवे यांनी दिली.
द्धव ठाकरेंनी असंगाशी संग करून दगाफटका केला
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. प्रचारादरम्यान भाजपाच्या सर्वच नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री राहतील, असे विधान केले. कोणत्याही शिवसेनेच्या नेत्याने त्यावेळी आक्षेप घेतला नाही. स्वतः उद्धव ठाकरे यांनीही कधी याबाबत वाच्यता केली नाही. २०१९ चा निकाल लागल्यानंतर माझ्याशिवाय सरकार बनणार नाही, असे जेव्हा चित्र दिसले, तेव्हा उद्धव ठाकरेंची भाषा अचानक बदलली. त्याच्या अगोदर ते कधीही त्यापद्धतीने बोलले नव्हते. आमची शिवसेनेबरोबरची युती २५ वर्षांपासूनची होती. उद्धव ठाकरेंनी असंगाशी संग करून दगाफटका केला, या शब्दांत दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेतला.
दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा महायुती जिंकेल, असा विश्वास व्यक्त करताना, महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकेरी आकड्यात जागा दिल्या जातील, या बातम्या निराधार आहेत. भाजपाच्या कोणत्या जबाबदार नेत्याने एक आकडी जागा देऊ, असे म्हटलेले नाही. आमची एकत्रित बैठक झाल्यानंतर सन्मानपूर्वक जागावाटप केले जाईल, त्यामुळे कुणालाही नाराज होण्याची गरज नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.