“शरद पवारांनी सांगावे की, १० वर्षांत काँग्रेसने महाराष्ट्राला किती निधी दिला”: अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 07:22 PM2024-04-23T19:22:10+5:302024-04-23T19:25:13+5:30
Amit Shah News: उद्धव ठाकरे यांना काहीच विचारणार नाही, कारण त्यांना आपल्या मुलाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही, असा टोला अमित शाह यांनी लगावला.
Amit Shah News: इंडिया आघाडीने राम मंदिर होऊ दिले नाही, पंतप्रधान मोदींनी पाच वर्षात राम मंदिर बांधले. महाराष्ट्राचे भले पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार करतील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी व्यक्त केला. अकोला येथे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची जाहीर सभा झाली. यावेळेस अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.
शरद पवारांना काही प्रश्न विचारायचे आहे. उद्धव ठाकरे यांना काहीच विचारणार नाही, कारण त्यांना आपल्या मुलाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. शरद पवारांना विचारायचे आहे की, तुम्ही १० वर्ष महाराष्ट्रातून केंद्र सरकारमध्ये होतात. कृषी मंत्रालय सांभाळत होतात. त्या १० वर्षात सोनिया गांधी, मनमोहन सिंह सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी किती निधी दिला. याचा हिशोब मिळाला पाहिजे की नाही, अशी विचारणा अमित शाह यांनी केली.
मी हा हिशोब देणार आहे
त्या १० वर्षात युपीए सरकारने १ लाख ९१ हजार कोटी दिले होते. भाजपा सरकारने गेल्या १० वर्षात ७ लाख ९१ हजार कोटी महाराष्ट्राला दिले. २ लाख ९० हजार कोटी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, ७५ हजार कोटी रस्ते निर्माणासाठी दिले, अशी आकडेवारीच अमित शाह यांनी दिली.