Sanjay Raut Vs Narayan Rane: संजय राऊतांवर नारायण राणेंची बोचरी टीका; म्हणाले, "केलेली पापं झाकण्यासाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 05:45 PM2022-04-07T17:45:03+5:302022-04-07T17:45:52+5:30
ईडीच्या जप्तीनंतर प्रथमच संजय राऊत मुंबईत येऊन घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
Narayan Rane vs Sanjay Raut: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर सक्तवसुली संचालनालय (ED) ने जप्तीची कारवाई केली. त्यानंतर पहिल्यांदाच राऊत दिल्लीहून मुंबईत आले. ते दिल्लीतून मुंबईत येत असल्याची बातमी शिवसैनिकांना मिळाल्यानंतर संजय राऊतांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी गर्दी केली. संजय राऊत यांचे शिवसैनिकांकडून जंगी स्वागत करण्यात आले. तसेच, सांताक्रुझ ते भांडूप अशी रॅलीही काढण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांवर विखारी टीका केली.
संजय राऊतांवर कारवाई झाल्यानंतर त्यांनी शक्तीप्रदर्शन करणं ही अयोग्य असल्याची भावना नारायण राणे यांनी व्यक्त केली. तसेच, संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर आहे, असा खोचक सवालही त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून केला. "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?? काळा पैसा मिळवायचा, अन् कारवाई झाली की बोंबलायचं... त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर?", असं बोचरी टीका करणारं ट्वीट नारायण राणे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून केलं.
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र??
— Narayan Rane (@MeNarayanRane) April 7, 2022
काळा पैसा मिळवायचाय, अन् कारवाई झाली की बोंबलायचं.. त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा?
संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत हे विमानतळावरून त्यांच्या भांडुप येथील निवासस्थानी जाणार आहेत. त्यानंतर ते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून घडलेल्या घटनांबाबत चर्चा करणार आहे.
शिवसेनेचा योद्धा दिल्लीहून मुंबईत येतोय!
विमानतळावर स्वागतासाठी आलेल्या शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी संजय राऊतांबाबत बोलताना, शिवसेनेचा योद्धा दिल्लीहून मुंबईत येतोय, असं विधान केलं. "गेली २ वर्षे हा योद्धा पक्षासाठी, महाविकास आघाडीसाठी भाजपाशी लढत आहे. त्यामुळे ईडी, सीबीआयच्या माध्यमातून राजकीय सुडापोटी संजय राऊतांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे आम्ही सगळे शिवसैनिक योद्ध्याला सलाम करण्यासाठी मुंबई विमानतळावर आलो आहोत. संपूर्ण शिवसेना संजय राऊत यांच्यासोबत आहे", असं सुनील राऊत म्हणाले.