“आत्तातरी एकनाथ शिंदे हेच CM असतील, परंतु पुढे...”, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 19:23 IST2023-07-22T19:23:31+5:302023-07-22T19:23:46+5:30
Maharashtra Politics: पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे, ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होतात, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.

“आत्तातरी एकनाथ शिंदे हेच CM असतील, परंतु पुढे...”, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे सूचक विधान
Maharashtra Politics: गेल्या काही राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांची भेट घेतल्याचे समजते. या दिल्ली दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. विशेष म्हणजे पंतप्रधान भेटीवेळी सगळे कुटुंबीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच सध्यातरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, असे सांगताना भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी सूचक विधान केले आहे.
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावरच सांगितले होते की, ते लवकरच मुख्यमंत्री बनतील. हे सांगणारा मी पहिला व्यक्ती होतो. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आतातरी एकनाथ शिंदे हेच CM असतील, परंतु...
आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. यात कोणताही बदल होणार नाही. पण, निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती पाहून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेते चर्चा करत निर्णय घेतील. भाजप कोणालाही धक्का देत नाही. ज्यांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे, ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होतात. आम्ही कोणाचाही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही, असे रावसाहेब दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनी माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.