Maharashtra Politics: भाजप नेते रावसाहेब दानवेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख! नव्या वादाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 10:35 PM2022-12-04T22:35:04+5:302022-12-04T22:35:52+5:30
Maharashtra News: राज्यपाल कोश्यारी, प्रसाद लाड यांच्यानंतर भाजप नेते रावसाहेब दानवेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपमान केल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. महाविकास आघाडीसह अन्य नेतेही राज्यपाल हटाव या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहेत. यानंतर भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले. मात्र, यातच भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता नवा वाद उफाळण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी छत्रपती शिवराय यांचा एकेरी उल्लेख केल्याने पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा रावसाहेब दानवेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर रावसाहेब दानवेंवर सर्वच स्तरातून टीका होत आहे.
नेमके काय म्हणाले रावसाहेब दानवे?
राज्यात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्याप्रकरणी प्रतिक्रिया देतानाचा रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्याची चौकशी व्हायला हवी. वक्तव्य वादग्रस्त होईल की नाही, हे तपासण्यात यावे, असे सांगताना रावसाहेब दानवे दिसत आहेत. तसेच आपणही शिवप्रेमी असल्याचे रावसाहेब दानवे नमूद करत आहेत. मात्र, याच व्हिडिओत पुढे बोलताना दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचे दिसून येत आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात असून, खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला.
दरम्यान, साताऱ्यात खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांनी शिवतीर्थाजवळ रावसाहेब दानवे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप पक्षाविरोधात घोषणबाजी केली. तर मराठा संघटनांही याप्रकरणात आक्रमक झाल्या असल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"