Ahmednagar Election: 'गोवा पॅटर्न' वापरून भाजपाने खेचली शिवसेनेची खुर्ची, आता होईल का युती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 01:14 PM2018-12-28T13:14:33+5:302018-12-28T13:15:52+5:30

शिवसेना-भाजपा एकत्र आले असते, तर सत्तास्थापनेचा काही प्रश्नच नव्हता. परंतु त्यांच्यातलं विळ्या-भोपळ्याचं नातं सर्वश्रुतच आहे.

BJP use Goa pattern to win mayor election in ahmednagar municipal corporation, shocks Shiv Sena | Ahmednagar Election: 'गोवा पॅटर्न' वापरून भाजपाने खेचली शिवसेनेची खुर्ची, आता होईल का युती?

Ahmednagar Election: 'गोवा पॅटर्न' वापरून भाजपाने खेचली शिवसेनेची खुर्ची, आता होईल का युती?

Next

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेली गोवा विधानसभेची निवडणूक... १७ जागा मिळवून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर  १३ जागांवर भाजपाचं 'कमळ' फुललं होतं... बहुमतासाठी हव्या होत्या २१ जागा... चार आमदार सहज मिळवता येईल, या 'ओव्हर कॉन्फिडन्स'नं काँग्रेसचा घात केला... अमित शहा-नितीन गडकरी यांनी एका रात्रीत आठ आमदारांचं गणित जमवलं आणि काँग्रेसच्या 'हाता'तून सत्तेचा घास हिरावून घेतला... या अनुभवातून काँग्रेस नेते भविष्यात शहाणे झाले, पण शिवसेना नेते बहुधा हा गोवा पॅटर्न विसरूनच गेले होते. या 'पॅटर्न'मुळेच अहमदनगरमध्ये त्यांचं सत्तेचं स्वप्न भंगलं आहे.  

१० डिसेंबरला धुळे आणि अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यापैकी धुळ्यात भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं, पण नगरमध्ये बराच वेळ आघाडीवर असलेली भाजपा हळूहळू मागे पडली होती आणि 'मोठा भाऊ' होता होता, 'छोटा भाऊ' ठरली होती. नगरमध्ये अपेक्षेप्रमाणे 'त्रिशंकू' निकाल लागला होता. शिवसेनेनं सर्वाधिक २४ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाला १४ जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. ६८ सदस्यांच्या नगर महापालिकेत बहुमतासाठी ३५ जागा आवश्यक होत्या. राष्ट्रवादीकडे १८ नगरसेवक होते, तर काँग्रेसचे ५ शिलेदार विजयी झाले होते. त्यामुळे 'मॅजिक फिगर' कोण, कशी गाठणार आणि महापौरपदाची खुर्ची कोण पटकावणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.

शिवसेना-भाजपा एकत्र आले असते, तर सत्तास्थापनेचा काही प्रश्नच नव्हता. परंतु, त्यांच्यातलं विळ्या-भोपळ्याचं नातं सर्वश्रुतच आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणारे हे दोन मित्र इथेही दंड थोपटून आमनेसामने उभे ठाकले होते. शिवसेनेसाठी हे गणित जमवणं तुलनेनं सोपं होतं. पण, रोजच टीकेचे बाण सोडणाऱ्या सेनेला हिसका दाखवण्याचा निर्धारच भाजपाने केला होता. त्यामुळे, राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, या उक्तीनुसार त्यांनी राष्ट्रवादीकडे 'टाळी' मागितली. ही संधी राष्ट्रवादीने सोडण्याचा प्रश्नच नव्हता. सुरुवातीला अडचणीच्या काळात देवेंद्र सरकारलाही 'आधार' देणाऱ्या 'घड्याळा'नं यावेळी आनंदानं भाजपाचा गजर केला. त्यांच्यासोबतच, बहुजन समाज पार्टीच्या चार आणि एका अपक्ष नगरसेवकालाही भाजपानं आपल्या सोबत घेतलं. या सगळ्या बेरजेमुळेच आज ३७ मतं मिळवून भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विराजमान झाले. आणखी एका महापालिकेवर कमळ फुललं. 

शिवसेनेनं सत्तास्थापनेसाठी फारसे प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं नाही. त्यामागे त्यांचं काही वेगळं गणित होतं का, भाजपा-राष्ट्रवादी युतीवर आता ते काय भूमिका घेतात, त्याचा प्रचारात वापर करतात का, नगरमधील राजकारणाचा देश आणि राज्य पातळीवर कसा परिणाम होणार, असे अनेक प्रश्न या महापौर निवडणुकीमुळे निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरं फारच रंजक असतील, हे मात्र नक्की. 

Web Title: BJP use Goa pattern to win mayor election in ahmednagar municipal corporation, shocks Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.