भाजपाकडून सत्तेसह संपत्तीचा वापर
By admin | Published: March 7, 2017 04:38 AM2017-03-07T04:38:01+5:302017-03-07T04:38:01+5:30
भाजपाने कधी नव्हे तो सत्ता आणि साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत केला.
ठाणे : राज्यातील महापालिकांसह जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये भाजपाने कधी नव्हे तो सत्ता आणि साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत केला.
असे असूनही राज्यात राष्ट्रवादीला क्रमांक-२ ची मते म्हणजे सुमारे ५६ लाख मते मिळाली आहेत. तरीही, पराभव मान्य करून जिथे कमी पडलो, तिथे आत्मचिंतन करणार असल्याचे ते म्हणाले.
पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. त्या वेळी एका हॉटेलात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. ते पुढे म्हणाले की, लोकशाहीत निवडणुकीत यशापयश येतच असते. आमच्या पक्षाने धैर्याने या अपयशाचा सामना केला आहे. या वेळची निवडणूक दोन मुद्यांवर अडचणीची ठरली. त्यात काँग्रेससोबत जशी आघाडी होणे आवश्यक होते, ती न झाल्याचा फटका, तर दुसरे म्हणजे महापालिका निवडणुकीपूर्वी काहींनी पक्ष सोडला, काहींनी ऐन निवडणुकीच्या वेळी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्याचीही निवडणूक निकालास झळ बसल्याचे ते म्हणाले. औरंगाबाद, पुणे, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी पक्षाला जे नुकसान झाले, त्याचा खोलात जाऊन विचार करण्यात येत आहे. यश प्राप्त करता आले नाही, त्याला कोणती कारणे किंवा कुठे कमी पडलो, यासाठीही कार्यकर्ते व नेत्यांकडून अभ्यास सुरू आहे. जिल्हा परिषदा निवडणुकांच्या बाबतीत विजयी जागा लक्षात घेता ते म्हणाले की, भाजपा क्रमांक-१ चा पक्ष ठरला. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी, तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. पण, भाजपा आणि राष्ट्रवादीतील अंतर मात्र जास्त नाही. राष्ट्रवादीला राज्यात ५६ लाख, तर भाजपाला ६० लाख मते मिळाली आहेत. हे अंतर अवघे ४ लाखांचे आहे.
जिल्हा परिषदा निवडणुकांत समविचारी पक्ष एकत्र आले असते, तर वेगळे चित्र बघायला मिळाले असते, असेही ते म्हणाले.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी नेते त्यावर चर्चा करतीलच. राज्यात पक्षाला मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवरून मतदार पक्षासोबत असल्याचे ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे हे यश मिळाले, त्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार. सत्ताधाऱ्यांनी विविध प्रकारे सत्तेचा गैरवापर करूनही राष्ट्रवादीस जे यश मिळाले आहे, त्याबद्दल पक्षप्रमुख म्हणून जनतेचा आभारी आहे.
पक्षांतरबंदीचा कायदा नव्हता, त्या वेळीसुद्धा अनेक जण पक्षाला सोडून गेले होते. हा पक्ष आणि पक्षाचा कार्यकर्ता जिद्दीने उभा राहतो. आगामी काळात अधिक उमेदीने काम करावे लागणार आहे. मोदीलाटेबाबत विचारल्यावर, ते आता लाट वाटत नाही. (प्रतिनिधी)
>विरोधी पक्षनेत्याचा निर्णय १९ मार्चला
ठाण्यातील विरोधी पक्षनेता कोण होणार, यासंदर्भात १९ मार्च रोजी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत तो निर्णय होणार आहे. आमदार परिचारक यांच्यासंदर्भात ते म्हणाले की, त्यांचे विधान बेताल असून बेजबाबदारपणाचे आहे. त्या वेळी माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड, तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, शहराध्यक्ष आनंद परांजपे, हणमंत जगदाळे आदी उपस्थित होते.