विदर्भात भाजपा, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी, सोलापुरात तृतीयपंथी सरपंच; सिंधुदुर्गचा गड राणेंनी राखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 04:13 AM2017-10-18T04:13:22+5:302017-10-18T04:20:54+5:30
ग्रामपंचायतीच्या दुस-या टप्प्यातील निवडणुकीत विदर्भात अपेक्षेप्रमाणे भाजपाने बाजी मारली असली अमरावती आणि चंद्रपुरात काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे.
मुंबई : ग्रामपंचायतीच्या दुस-या टप्प्यातील निवडणुकीत विदर्भात अपेक्षेप्रमाणे भाजपाने बाजी मारली असली अमरावती आणि चंद्रपुरात काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे.
नागपूर जिल्ह्यातील २३६ ग्रामपंचायतींपैकी १३२ ठिकाणी जिंकल्याचा दावा भाजपाने केला आहे. तर काँग्रेसने १४८ तर शिवसेनेने ४८ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ५२ पैकी काँग्रेसने १९ तर भाजपाने १८ ग्रामपंचायतींवर दावा सांगितला आहे. तीन ठिकाणी शिवसेना, प्रत्येकी दोन ठिकाणी शेतकरी संघटना व गोंडवाना गणतंत्र पार्टीने विजय मिळविला. एका ठिकाणी राकाँ आणि सहा ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. राज्याचे अर्थ, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील १६ पैकी १० ग्रामपंचायतींवर भाजपाने वर्चस्व सिद्ध केले आहे. वर्धा जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. यात ५० ठिकाणी भाजपाचे वर्चस्व आहे. २६ ग्रामपंचायतींवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शिवसेनेच्या ताब्यात प्रत्येकी तीन ग्रामपंचायती राहिल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १५ सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपने केला आहे. गोंदियातील ७० टक्के ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात भाजपची मुसंडी मारली असून २०४ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदावर दावा केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सरशी
पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचा वारु रोखण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४७२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या होत्या. यापैकी ४३५ ठिकाणी मतदान झाले होते. १५० ठिकाणी स्थानिक आघाड्यांना यश मिळाले आहे. तर राष्ट्रवादी ७३, काँग्रेस ६८, शिवसेना ६२ तर भाजपाला ४७ ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यात यश मिळाले आहे. सांगलीत काँग्रेसकडे १११ तर राष्ट्रवादीला ७६ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. ६२ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाल्याचे दावा भाजपाने केला आहे. राष्ट्रवादीने वाळवा, शिराळा, तासगाव तालुक्यातील गड राखण्यात यश मिळविले असले तरी, जत, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळमध्ये निराशाजनक कामगिरी तर साताºयात ११२ ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.
मुख्यमंत्र्यांना असाही दणका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले नागपूर ग्रामीण तालुक्यातील फेटरी व पालकमंत्री, तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्तक घेतलेल्या सुरादेवी या गावात भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपाच्या सरपंच उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले.
भाजपा पुरस्कृत सरपंच
सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथे भाजपा पुरस्कृत ज्ञानेश्वर कांबळे हे तृतीयपंथी सरपंच निवडून आले आहेत. विजयानंतर कांबळे यांची जोरदार मिरवणूक काढण्यात आली. या ठिकाणचे सरपंचपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यात ज्ञानेश्वर कांबळे यांना सर्वाधिक ८३४ मते मिळाली. त्यांनी जयसिंग साळवे (६६७ मते) यांचा पराभव केला.
सिंधुदुर्गमध्ये राणेंचे वर्चस्व : कोकणात सिंधुदुर्गवर पुन्हा नारायण राणेंचेच वर्चस्व राहिले आहे. एकूण ३२५ ग्रामपंचायतींपैकी २३५ ग्रामपंचायतींवर समर्थ विकास पॅनेलने विजय संपादन केल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत बोलताना केला, तर भाजपाने ७१ ग्रामपंचायतींवर सरपंच निवडून आणल्याचा दावा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केला आहे. रत्नागिरीत २१५ पैकी ११७ सरपंच शिवसेनेचे निवडून आले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत दुस-या टप्प्यातील ३ हजार ६६६ पैकी एक हजारांवर ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
दुस-या टप्प्यातही भाजपाच क्रमांक एकवर आहे. भाजपाचे नेमके किती सरपंच आहेत हे सिद्ध करण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय सरपंच मेळावा आयोजित करू.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री