"दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमध्ये सोबत नेण्यापेक्षा तडीपार होणे..."; विनोद तावडेंचा शरद पवारांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:28 IST2025-01-15T12:19:07+5:302025-01-15T12:28:49+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर शरद पवारांनी केलेल्या टीकेला विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे

"दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमध्ये सोबत नेण्यापेक्षा तडीपार होणे..."; विनोद तावडेंचा शरद पवारांवर पलटवार
Vinod Tawade on Sharad Pawar: शिर्डीतल्या भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांनी फोडाफोडीच्या राजकरणाला सुरुवात केल्याचे म्हणत अमित शाह यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन अमित शाह यांना प्रत्युत्तर देताना गृहमंत्री यांनी माहिती घेऊन भाषण करायला हवं असं म्हटलं. यावेळी शरद पवार यांनी तडीपार असाही उल्लेख केला होता. त्यावरुनच आता भाजप नेते विनोद तावडे यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे.
शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या एकदिवसीय अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवार यांनी १९७८ मध्ये सुरू केलेले आणि उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये केलेले विश्वासघाताचे राजकारण महाराष्ट्रातील मतदारांनी जमिनीखाली २० फूट गाडून टाकले, अशी टीका अमित शाह यांनी केली. अमित शाह यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. अमित शाह यांनी थोडीफार माहिती घेऊन भाषण केले तर लोकांच्या मनात शंका निर्माण होणार नाही, असा पलटवार शरद पवार यांनी केला. तसेच आपण असा गृहमंत्री पाहिलेला नाही जो तडीपार करण्यात आला आहे, असेही शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी केलेल्या टीकेला आता भाजप नेते विनोद तावडे यांनी सोशल मिडिया पोस्टमधून प्रत्युत्तर दिलं आहे. "दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटरमध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा मा. पवार साहेब विसरले आहेत," अशी टीका विनोद तावडे यांनी केली आहे.
दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती!
— Vinod Tawde (@TawdeVinod) January 15, 2025
दाऊद हस्तकांना संरक्षण हे…
काय म्हणाले होते शरद पवार?
"यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होतं. गुजरातने उत्तम प्रशासकांची ओळख देशाला करून दिली. जी नावं मी तुम्हाला सांगितली त्यापैकी सर्वांचे एक वैशिष्ट्य होतं की त्यापैकी कोणालाही कधी त्यांच्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हतं. तो प्रसंग कधी या राज्यकर्त्यांवर आला नाही. त्यामुळे गृह खातं आणि गुजरातमधून येणाऱ्या प्रशासकांची आज मला आठवण होत आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषण केलं. भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण थोडीफार माहिती घेऊन भाषण केली तर लोकांच्या मनात शंकेची स्थिती निर्माण होत नाही. १९७८ सालापासून माझी आठवण त्यांना झाली. चाळीस वर्षांपूर्वी राजकारणात ते नक्की कुठे होते हे मला माहिती नाही. पण १९७८ साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो," असं शरद पवार यांनी म्हटलं.