Chandrakant Patil Sanjay Raut, Warning : "आमच्यावर हल्ले कराल तर..."; संजय राऊत यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 06:42 PM2022-02-16T18:42:39+5:302022-02-16T18:43:25+5:30
शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत संजय राऊतांनी भाजपावर केला होता हल्लाबोल
Chandrakant Patil Sanjay Raut, Warning : "संजय राऊत यांच्या पोकळ धमक्यांना भाजपा घाबरत नाही. भाजपाच्या विरोधकांनी हे ध्यानात घ्यावे की हा नवा भाजपा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न शंभर जणांनी केला तर पाठिंब्यासाठी भाजपाचे एक हजार कार्यकर्ते पोहोचले. किरीट सोमय्या यांच्या हत्येचा प्रयत्न झाला तर त्यांच्या समर्थनासाठी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे आमच्यावर हल्ले कराल तर निराशेशिवाय काहीही हाती लागणार नाही", असा स्पष्ट शब्दात इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना दिला.
संजय राऊतांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपाच्या लोकांवर हल्लाबोल केला होता. त्याला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. "महाविकास आघाडी सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाची मर्यादा साडेसात लाखापर्यंत वाढवली. पण मराठा युवकांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून दिली जाणारी दहा लाख रुपये बिनव्याजी कर्जाची योजना ठप्प केली. महाविकास आघाडी सरकारने अरबी समुद्रातील शिवस्मारकाला असलेली स्थगिती उठविण्यासाठी दोन वर्षात पाठपुरावा केला नाही. या सरकारला मराठा आरक्षण देण्याची इच्छा नाही. मराठा समाजासाठी छत्रपती संभाजी राजे यांच्या उपोषणाला भाजपाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी जे कोणी रस्त्यावर उतरतील त्यांना भाजपा पाठिंबा देईल", असा पुनरूच्चार चंद्रकांत पाटील यांनी केला.
"मोहित कंबोज देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील की नाही याची काळजी संजय राऊत आणि शिवसेनेने करू नये. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही समर्थ आहोत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'पे रोल' वर राहून पवार साहेबांचा अजेंडा चालविणारे संजय राऊत हे अंतिमतः वाट लावणार आहेत व आपल्याला खड्ड्यात घालणार आहेत हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेले दिसत नाही. अडीच वर्षांपूर्वी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना युती तोडण्यासाठी भरीस घातले. भाजपासोबतची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यानंतर शिवसेनेने मुस्लीम मतांच्या मागे लागून आपला मूळ पाया संपविला. यामुळे आपल्याला मानणारी जनता तसेच आपले जुने नेते-कार्यकर्ते सोबत राहणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंच्या अजूनही लक्षात आलेले नाही", असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.