.. तर शिवसेनेच्या विरोधात भाजपही बोलेल

By admin | Published: November 15, 2015 10:15 PM2015-11-15T22:15:26+5:302015-11-16T00:11:15+5:30

माधव भंडारी : महापालिका निवडणुकीत गप्प बसलो असतो तर मतदारांमध्ये संभ्रम झाला असता..

The BJP will also speak against Shiv Sena | .. तर शिवसेनेच्या विरोधात भाजपही बोलेल

.. तर शिवसेनेच्या विरोधात भाजपही बोलेल

Next

फलटण : ‘बिहार राज्याच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी तेथील निवडणूक निकालाचा परिणाम आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांवर होणार नाही. आगामी काळात राज्यातील प्रश्नांबाबत शिवसेना नेते काही बोलणार असतील तर आम्हीही विरोधात बोलू,’ असा इशारा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीत गप्प बसलो असतो तर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असता असेही स्पष्ट केले. फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे महाराष्ट्र युवक व्यसनमुक्त कार्यालय इमारतीच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारात नागरी प्रश्न व विकासाच्या मुद्द्यावर भाजपचे नेते बोलत असताना शिवसेनेने आमच्यावर टीका केली. आम्हालाही ‘सौ सोनार की एक लोहार की’ याप्रमाणे बोलावे लागले. आम्ही गप्प बसलो असतो तर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असता, असे स्पष्ट करून ते म्हणाले, ‘शिवसेना मित्र आहे म्हणूनच आम्ही मर्यादा पाळत आहोत. मात्र, ते काही बोलणार असतील तर आम्हीही
विरोधात बोलण्यास मागे राहणार नाही.’
‘बिहार निवडणुकीचे परिणाम अन्य कुठल्याही राज्याच्या निवडणुकांवर होणार नाहीत. बिहारमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याच्या निकालाने पक्षांतर्गत कोणतीही धुसफूस नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपची घोडदौड सुरूच राहणार आहे.’
भाजपचे सरकार केंद्र व राज्यात आल्यापासून विकासकामांना गती आली आहे. सामान्यांच्या हिताची अनेक कामे करायची आहेत. अशा स्थितीत काही पक्ष अपप्रचार करीत आहेत, असे सांगून भंडारी म्हणाले, ‘काँग्रेस व डाव्यांना भाजपचे अस्तित्व मान्य नाही.
राज्यात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ पडला आहे. अशा स्थितीत सरकारने २४ टीएमसी पाणी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शासनाने तुरडाळीच्या साठ्यावर धाडी घालून कारवाई करून दरवाढीवर नियंत्रण मिळवले. मात्र २०१२-१३ मध्ये तूरडाळीचे भाव २१० रुपये प्रतिकिलो होते. तत्कालीन सरकारला त्या वेळी डाळीचे भाव कमी करता आले नाहीत.’ (प्रतिनिधी)

पालखी मार्गाचे काम लवकरच...
आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार लवकरच सुरू होणार आहे. पंढरपूर येथील वाळवंटाचा प्रश्न न्यायालयाच्या आधीन राहून भाजप सरकारनेच सोडविला आहे. आणखी दोन पाऊस झाल्यास राज्याचा चेहरामोहरा भाजप बदलून दाखवेल. त्याचबरोबर अच्छे दिन आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी विविध योजना प्रभावी राबविण्यासाठी आग्रही आहेत, असेही भंडारी यांनी सांगितले.

Web Title: The BJP will also speak against Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.