...तर भाजपा भुईसपाट होईल
By Admin | Published: January 18, 2017 06:50 AM2017-01-18T06:50:02+5:302017-01-18T06:50:02+5:30
भाजपासोबत युती नकोच, असा सूर मंगळवारी शिवसेनेच्या नेत्यांनी येथे झालेल्या मेळाव्यात लावला.
औरंगाबाद : भाजपासोबत युती नकोच, असा सूर मंगळवारी शिवसेनेच्या नेत्यांनी येथे झालेल्या मेळाव्यात लावला. भाजपाशी युती झाली नाही, तर भाजपा भुईसपाट होईल, असे वक्तव्य राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले, तर दुसरीकडे खा. चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा खरा प्रतिस्पर्धी भाजपाच असल्याचे वक्तव्य केले. मंगळवारी येथे झालेल्या औरंगाबाद-जालना शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिक पातळीपर्यंतच्या
भाजपा यंत्रणेवर जोरदार टीका
करत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.
नगरपालिका निवडणुकीच्या वेळी औरंगाबादेतील गुलमंडीतून (गुलमंडीत भाजपाचा पदाधिकारी राहातो.) भाजपाने दीड कोटी पाठविले, तर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नगरपालिकेसाठी दीड ते दोन कोटी रुपयांचा मलिदा वाटल्याचा गंभीर आरोप खैरे यांनी केला. केलेले आरोप सिद्ध करून दाखवेन, पैठणमध्ये भाजपाचे लोक पैसे वाटताना पकडले गेले. जि.प. निवडणुकीतदेखील भाजपा पैठण पॅटर्न राबवेल. भाजपा शिवसेनेशी सुडाचे राजकारण करीत आहे. त्यामुळे युती कशाला करायची? लक्ष्मीदर्शनची भाषा करणारे खा. रावसाहेब दानवे कानात सांगतात, जा कामाला लागा, असे खैरे म्हणाले.
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तर भाजपाला सज्जड दम भरला. भाजपाने शिवसेनेसोबत युती केली नाही, तर ते भुईसपाट होतील, असा अहवालच माझ्याकडे आहे. त्यामुळे युती करायचीच नाही, असे माझे मत आहे. तुमचे मत काय आहे, असे त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारले, त्या वेळी सर्वांनी हात उंचावून ‘युती नको ’, ‘युती नको’ असा सूर लावला. भाजपा वाजवीपेक्षा जास्त जागा मागत आहे. त्यामुळे युतीबाबत विचार करावाच लागेल, असे खोतकर म्हणाले. (प्रतिनिधी)
>नेत्यांनो, खिशात हात घाला!
या वेळी परभणीचे खा. संजय जाधव हे व्यासपीठावरील खा. खैरे, राज्यमंत्री खोतकर यांच्याकडे पाहून म्हणाले, तुमच्या निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असेल, तर या निवडणुकींमध्ये १ ते २ कोटींचा खर्च नेत्यांनी केला पाहिजे. भाजपाने पुण्यातील एका निवडणुकीत १० हजार रुपये एका मताला दिले. नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी खिशात हात घातला पाहिजे. नेत्यांनी बहाणे करून निवडणुकीतून पळ काढू नये. त्यांनी सर्कल, गणाची जबाबदारी घेतली पाहिजे.तसेच उमेदवारी मिळेपर्यंत लाखोंचा खर्च करण्याची भाषण करणारे उमेदवारी मिळताच हातवर करून टाकतात, असेही ते म्हणाले.