भाजप निवडणुकीचा बिगुल २१ जुलै रोजी फुंकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 05:28 AM2019-07-13T05:28:50+5:302019-07-13T05:28:52+5:30
१० हजार पदाधिकारी, लोकप्रतिनिधी येणार; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक
मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल भाजप २१ जुलैला फुंकणार असून त्यासाठी मुंबईत १० हजार पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विशेष कार्यसमिती बैठक होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
२० जुलै रोजी भाजपच्या मुंबई कार्यालयात प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक होईल. तीत नड्डा मार्गदर्शन करतील. दुसऱ्या दिवशी गोरेगाव, पूर्व येथील कन्व्हेंशन सेंटरमध्ये विशेष कार्यसमिती बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाचे राज्यातील आमदार, खासदार, अन्य लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, आघाड्यांचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आदींसह १० हजार जण उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आॅक्टोबरमध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपची ही सर्वात मोठी बैठक असेल. १ आॅगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभर यात्रा काढणार आहेत. या यात्रेच्या तयारीसंदर्भातही बैठकीत चर्चा होईल.