दोन मित्रपक्षांना ११० जागा, १७८ जागा भाजप लढणार?; शिवसेना, राष्ट्रवादीची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 07:26 AM2023-07-14T07:26:12+5:302023-07-14T07:32:09+5:30
१५२ जागा जिंकण्याच्या बावनकुळेंच्या विधानाने भुवया उंचावल्या
भिवंडी : भाजप २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत १५२ जागा जिंकेल आणि आम्ही लढविलेल्या जागांपैकी ८५ टक्के जागा जिंकू असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात केले. त्यामुळे भाजप १७८ जागा लढणार व शिवसेना व राष्ट्रवादी यांना मिळून ११० जागा सोडणार असल्याचा स्पष्ट तर्क त्यातून निघाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ज्या रिसॉर्टमध्ये शिबिर झाले, तेथे ठिकठिकाणी भाजपच्या ‘१५२ प्लस’ या मिशनचे फलक लावले होते. बावनकुळे पत्रपरिषदेत म्हणाले की, राज्यात आमची महायुती लोकसभेच्या ४५ जागा जिंकेल. आमची तीन पक्षांची युती विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकेल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, बावनकुळे जेवढ्या जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत आहेत ते साध्य होण्यासाठी आवश्यक त्या जागा त्यांना लढायला मिळतील असे म्हणत बावनकुळे यांच्या विधानाला बळ दिले.
लोकशाही आहे; बोलण्याचे स्वातंत्र्यही आहे. प्रत्येकजण आपापले आकडे सांगत असतो. बावनकुळे बोलले असतील पण निर्णय तीन पक्षांचे वरिष्ठ नेतेच घेतील. आता तीन पक्षांची समन्वय समितीही नेमली आहे. समन्वय नक्कीच वाढेल.- उदय सामंत, मंत्री (शिवसेना)
बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत पण जागावाटपात त्यांना किती अधिकार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आमचे वरिष्ठ नेते भाजपच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करतील व ठरवतील. या विषयी अधिक भाष्य करणे योग्य नाही. - सूरज चव्हाण, प्रवक्ते, राष्ट्रवादी (अजित पवार गट)