राणे, गोयल, मुनगंटीवार, महाजनांना लोकसभेच्या मैदानात उतरविणार; गडकरींना नाही?
By यदू जोशी | Published: February 25, 2024 07:19 AM2024-02-25T07:19:48+5:302024-02-25T07:35:29+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातून संधी दिली जाणार नाही, अशी चर्चा सुरू होती...
- यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकसभेच्या रिंगणात काही मंत्र्यांना उतरविण्याचा विचार भाजपकडून केला जात आहे. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, पीयूष गोयल, राज्याचे सांस्कृतिक कार्य व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नावांची चर्चा आहे.
राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून मैदानात उतरविण्याची चर्चा आहे. ते मंत्री असले तरी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. राज्यसभेसाठी त्यांना संधी दिली नाही, तेव्हाच ते लोकसभा लढणार, अशी चर्चा सुरू झाली होती.
मुनगंटीवार चंद्रपूरमध्ये, तर छ. संभाजीनगरला कोण?
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून लढविले जाईल, हे जवळपास निश्चित मानले जाते. २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी भाजपचे हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. धानोरकर यांचे गेल्यावर्षी निधन झाले. त्यानंतर तेथे पोटनिवडणूक झाली नाही. आताच्या निवडणुकीत धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेस संधी देईल, अशी जोरदार चर्चा आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये २०१९च्या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव ‘एमआयएम’चे इम्तियाज जलिल यांनी केला होता. ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्याला द्यावी, अशी भाजपची इच्छा असल्याचे सांगण्यात येते. तेथे अतुल सावे वा केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्यापैकी एक उमेदवार असेल, असे मानले जाते.
नितीन गडकरींना नागपुरात पुन्हा संधी
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातून संधी दिली जाणार नाही, अशी चर्चा असली, तरी त्यांनाच पुन्हा संधी मिळेल,हे नक्की आहे.
- रावसाहेब दानवे यांना जालन्यातून पुन्हा संधी द्यायची की त्यांच्या मुलाला, याबाबत विचार करत आहे.
- जळगाव लोकसभा मतदारसंघात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना लढविण्यावर गांभीर्याने विचार सुरू आहे.
- विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून, तर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उत्तर-मध्य मुंबई किंवा उत्तर मुंबईतून लढविले जाऊ शकते.