होय 288 जागांवर उमेदवारांची चाचपणी: भाजप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 01:08 PM2019-08-20T13:08:21+5:302019-08-20T13:19:00+5:30
गेल्यावेळी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युती करणाऱ्या भाजप-शिवसेनेने त्यावेळी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवली होती.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेत युती झाली असली तरीही, विधानसभा निवडणुकीत मात्र युती होणार का? यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. त्यातच आता भाजपने संपूर्ण 288 मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सूर केली असल्याची माहिती खुद्द भाजप प्रवक्ते व आमदार गिरीश व्यास यांनी दिली आहे. नागपुरात बोलताना ते म्हणाले.
गेल्यावेळी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत युती करणाऱ्या भाजप-शिवसेनेने त्यावेळी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवली होती. तर आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा युती फिसकटली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे भाजपने आधीच स्वबळाची तयारी सुरु केली असल्याचे दिसत आहे. आणि यावर आमदार व्यास यांनी अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब केला आहे. नागपूर येथे बोलताना ते म्हणाले की, युती करण्यासाठी भाजप-शिवसेना दोन्ही पक्षात चर्चा सुरु असली तरीही, आम्ही राज्यातील सर्वच्या सर्व 288 जागांवर संभाव्य उमेदवार कोण असणार याची चाचपणी सूर केली असल्याचे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत सुद्धा आम्ही संपूर्ण 48 मतदारसंघाचा आढावा घेतला होता. त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच्या सर्व 288 जागांवर चाचपणी सुरु केली असून, त्यासाठी भाजपने सर्वेक्षण सुद्धा सुरु केले असल्याचे व्यास म्हणाले. ऐनवेळी युती तुटली तर उमेदवार शोधण्याची वेळ येऊ नयेत म्हणून भाजपने आधीच सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात संभाव्य उमेदवार कोण असणार याची चाचपणी करण्याचे काम सुरु केले असल्याचे बोलले जात आहे. मात्र युती बाबत काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.