भाजपाला 31 डिसेंबरपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार; सुधीर मुनगंटीवार यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 05:19 PM2019-11-06T17:19:50+5:302019-11-06T17:28:31+5:30
उद्या राज्यपालांना भेटण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील जाणार आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. यामध्ये शेतकऱ्यांवरील संकाटवर चर्चा झाल्याचे सांगताना महाराष्ट्र भाजपाला येत्या 31 डिसेंबरपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.
उद्या राज्यपालांना भेटण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील जाणार आहेत. आम्ही दोघेही मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच राज्यपालांना भेटण्यास जात असल्याचा खुलासा मुनगंटीवार यांनी केला. त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला.
यावर चंद्रकांत पाटलांना नुकतेच प्रदेशाध्यक्षपद दिलेले असताना लगेचच नवा प्रदेशाध्यक्ष कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी यावरही खुलासा केला आहे. सध्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची मुदत 31 डिसेंबरला संपत असून राष्ट्रीय पातळीवर ही निवड केली जाते. यामुळे चंद्रकांत पाटलांना मुदतवाढ द्यावी की अन्य कोणाला हे तेव्हाच स्पष्ट होईल असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
तसेच सरकार महायुतीचेच होईल, असेही त्यांनी सांगताना कोणाला काहीही वाटू दे, कोणाला काहीही म्हणू दे, कारण जनादेश महायुतीच्या बाजुने होता, असे मुनगंटीवार म्हणाले.
रावसाहेब दानवे यांना केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद मिळाल्याने भाजपाच्या नियमानुसार एक व्यक्ती एक पद यानुसार प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले होते. यामुळे चंद्रकांत पाटील यांना नवा प्रदेशाध्यक्ष बनविण्यात आले होते. आता त्यांची मुदत संपत आहे.