कधी संपेल शिवसेना, भाजपामधील सुंदोपसुंदी? शरद पवारांची मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 08:59 AM2019-11-02T08:59:15+5:302019-11-02T09:00:50+5:30
अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल शरद पवारांचं मोठं विधान
मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला असला, तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. सत्तेच्या समान वाटपाचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेनं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. तर 7 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं म्हणत भाजपानं शिवसेनेवर दबाव वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ता स्थापनेबद्दल भाकीत वर्तवलं आहे.
भाजपा, शिवसेनेकडून एकमेकांना दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यावर भाष्य करताना राज्यातील सत्ता स्थापनेचा प्रश्न 10 दिवसांत सुटेल, असं पवार यांनी म्हटलं आहे. पुढील 10 दिवसांत शिवसेना, भाजपा एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असा अंदाज पवारांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्यासाठी भाजपाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं लागेल, असं पवार म्हणाले आहेत.
आपल्या समोर इतर पर्याय खुले आहेत म्हणत भाजपावर दबाव आणणाऱ्या शिवसेनेला पवार यांनी धक्का दिला आहे. आम्हाला शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत माझं बोलणं झालेलं नाही, हे स्पष्ट करत पवारांनी शिवसेनेच्या दाव्यातील हवा काढून घेतली. राज्यात लवकर सत्ता स्थापन व्हावी असं म्हणत त्यांनी अयोध्या प्रकरणाच्या निकालाकडे लक्ष वेधलं. अयोध्या प्रकरणाचा निकाल येण्यापूर्वी राज्यात स्थिर सरकार येणं गरजेचं आहे. कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टीनं ते अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेनेनं पोरखेळ थांबवून सत्ता स्थापन करावी, असं पवार म्हणाले.
राज्यात 56 जागा जिंकणारी शिवसेना सत्तेच्या समान वाटपासाठी आग्रह आहे. लोकसभेवेळी ठरल्याप्रमाणे सत्तेत समान वाटा मिळावा. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यात यावं, अशा शिवसेनेच्या मागण्या आहेत. मात्र पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. याशिवाय गृह, अर्थ, महसूल, नगरविकास यांच्यासारखी महत्त्वाची खाती शिवसेनेला न देण्याची भूमिका भाजपानं घेतली आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू आहे.